सोशल मिडीयावर 'ओ एम टी' याचा फुल फॉर्म काय असं ट्रेंड होत होतं. त्यात मराठी कला विश्वातील काही कलाकारांनी हे पोस्ट करुन सगळ्यांनाच कोड्यात पाडलं होतं. त्यानंतर काही दिवसात याचा फुल फॉर्म समोर आला. ‘ऑनलाईन माझं थिएटर’ असा याचा फुल फॉर्म आहे. तर यात सहभागी होणाऱ्यांची गमतीदार नावही समोर आली. मात्र यात नेमकं काय पाहायला मिळेल, यात कोण सहभागी असतील याविषयी काहीच कल्पना येत नव्हती. आणि आता याचा एक छोटा टिझर या कलाकारांनी समोर आणलाय. हा एक ऑनलाईन स्पर्धात्मक कार्यक्रम असणार आहे. याविषय़ी यात सहभागी झालेला अभिनेता आरोह वेलणकरशी पिपींगमून मराठीने संवाद साधला असता त्याने यातलं काही रिव्हील न करता तो म्हटला की, “ही एक ऑनलाईन शो कम स्पर्धा आहे. सविस्तर सांगू शकत नाही आता, पण या व्हिडीओत स्पर्धकांची नावे आहेत. त्याच्यात काय काय गमती जमती होणार हे कालांतराने कळेलच हे आता सांगू शकत नाही पण हा पहिला ऑनलाईन शो असेल. मी खूप उत्सुक आहे याच्यासाठी काहीतरी नवी करू पाहतोय आम्ही सगळे. काहीतरी नवीन एक्टिव्हीटी यातून तयार होईल.”
नुकत्याच सोशल मिडीयावर प्रदर्शित केलेल्या या व्हिडीओत या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या कलाकारांची नावे समोर आली आहेत. मिलींद फाटक, भार्गवी चिरमुले, शुभांकर तावडे,
नंदीता पाटकर, ऋतुराज शिंदे, संकर्षण कऱ्हाडे, ऋतुजा बागवे, आरोह वेलणकर, गौरी नलावडे, मयुरी वाघ, रसिका आगाशे, हेमांगी कवी, नेहा शितोळे, आशुतोष गोखले, विकास पाटील, संदीप पाठक, नचिकेत देवस्थळी, सुनील अभ्यंकर, आरती मोरे,प्रिया मराठे हे कलाकार यात पाहायला मिळतील.
या व्हिडीओला अभिनेता सचिन खेडेकर यांचा आवाज आहे. यात अभिनेता सुनील बर्वे यांच्या ‘सुबक’ नाट्यसंस्थेचाही उल्लेख असल्याने ‘सुबक’ची ही निर्मिती असल्याचं पाहायला मिळतय. लवकरच याविषयीची सविस्तर माहितीही हे कलाकार समोर आणतील एवढं नक्की.
यात कलाकारांनी असं कॅप्शन लिहीलय की, "घरात बसलो म्हणून का हो , अडतंय आमचं खेटर ....अभिव्यक्त होण्यासाठी आता Online माझं theatre... !" तेव्हा हे ऑनलाईन थिएटर अनुभवण्यासाठीची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.