सरकारच्या परवानगी नंतर मनोरंजन विश्वातील चित्रकरणासह विविध कामाला सुरुवात झाली आहे. कलाकार आणि क्रू नियमांचं पालन करत आता पुन्हा कामाला लागले आहेत.
अभिनेता स्वप्निल जोशी देखील कामाला रुजू झाला आहे. आगामी ‘बळी’ या हॉरर सिनेमासाठीच्या डबिंगला त्याने सुरुवात केली आहे. लॉकडाउनच्या काळात स्वप्निलदेखील घरीच होता. त्यामुळे बऱ्याच दिवसांनी कामाला सुरुवात केल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतोय. या सिनेमाचे दिग्दर्शक विशाल फुरिया यांनी सोशल मिडीयावर स्वप्निलचे फोटो पोस्ट करून याविषयी माहिती दिली आहे.
या सिनेमातून स्वप्निल जोशी पहिल्यांदाच हॉरर सिनेमात पाहायला मिळणार आहे. हा सिनेमा कधी प्रदर्शित होईल याविषयी कोणतीच माहिती मात्र अद्याप समोर आलेली नाही. आत्तापर्यंत बऱ्याचदा रोमँटिक भूमिकांमध्ये दिसणारा स्वप्निल या निमित्ताने हॉरर जॉनरमध्ये पाहायला मिळेल. शिवाय नुकत्याच आलेल्या ‘समांतर’ या वेब सिरीजमध्येही स्वप्निलची वेगळी भूमिका पाहायला मिळाली आहे.