पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवलमध्ये (पिफ) अक्षय कुमारची निर्मिती असलेल्या चुंबकला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार मिळाला. १७ व्या पिफच्या पुरस्कार सोहळ्यात तीन विभागासाठी बक्षीस मिळवायचा मान ‘चुंबक’ला मिळाला आहे. या फेस्टीव्हलमध्ये स्वानंद किरकिरे यांना अभिनयातील पदार्पणासाठी उत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट पटकथा आणि सर्वोत्कृष्ट सिनेमा अशा तिनही विभागात चुंबकने बाजी मारली आहे. अक्षय कुमारसाठी यापेक्षा चांगलं वेडिंग अॅनिव्हर्सरी गिफ्ट असूच शकत नाही.
पण काही सिनेमे असेही असतात, जे पाहताना नकळत आपल्याला जगण्याकडे पाहण्याचा एक नवा दृष्टीकोन देऊन जातात. नुकताच प्रदर्शित झालेला चुंबक हा मराठी सिनेमा असंच काहीसं आपलं चाकोरीबाहेरचं वेगळेपण सिध्द करतो. बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमारने जेव्हा चुंबक सिनेमाची कथा ऐकली तेव्हा तो अक्षरश: त्याकडे चुंबकासारखाच आकर्षित झाला आणि त्याने हा सिनेमा प्रस्तुत करण्याचे पक्के केले. एका आगळ्या-वेगळ्या कथेवर हा सिनेमा बेतला आहे. काहीसा वेगळ्या धाटणीचा हा सिनेमा असून आपल्या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी झटणा-या एका 15 वर्षीय मुलाचा हा प्रवास आहे.
विशेष म्हणजे स्वानंद किरकिरे यांनी साकारलेली गतिमंद व्यक्तीची भूमिका वाखाणण्याजोगी आहे. हा त्यांचा पहिला सिनेमा आहे असं जाणवणार देखील नाही इतक्या सफाईने त्यांनी अभिनय केला आहे. ‘चुंबक’ला मिळालेल्या पुरस्काराने मराठीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.