महाराष्ट्राला हास्याची देणगी उदार हातांनी ज्यांनी दिली ते व्यक्तिमत्त्व म्हणजे पु. ल. देशपांडे. अवघ्या मराठी जनांच्या मनात विशेष स्थान असलेल्या पु.लं. वरील बायोपिक ‘भाई: व्यक्ती कि वल्लीच्या उत्तरार्धाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. या ट्रेलरमध्ये पु.लं.च्या व्यक्ती ते व्यक्तिमत्त्वापर्यंतच्या प्रवासाची झलक दिसून येते.
ट्रेलरची सुरुवात होते तीच व्यक्ती आणि वल्लीमधील एका पात्राच्या आणि पु. लं.च्या संवादाने. यावेळी स्वत:च्या लेखनाला न ओळखणारे पु.लं. प्रेक्षकाच्या चेह-यावर हसू आणतात. याच ट्रेलरमध्ये बटाट्याच्या चाळीच्या नाट्य सादरीकरणाची झलकही दिसून येते.
पण याच ट्रेलरमध्ये दिसते ती लेखकाची नव्या माध्यमाशी जुळवून घेताना होत असलेली घुसमट. त्यावेळी सुनीताबाईंनी दिलेली खंबीर साथ या सगळ्याची झलक ट्रेलरमधून पाहता येते.
उत्तरार्धाचा ट्रेलर सिनेमाबद्द्लची उत्सुकता वाढवतो यात शंका नाही. ‘भाई: व्यक्ती कि वल्लीचा उत्तरार्ध ८ फेब्रुवारीला रिलीज होत आहे. महेश वामन मांजरेकर यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. वायकोम १८ मराठीची निर्मिती असलेला हा सिनेमा दोन भागात प्रदर्शित होणार आहे. पहिला भाग ४ जानेवारी २०१९ला रिलीज झाला. आता उत्तरार्धाच्या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्कंठा वाढवली आहे.
https://www.youtube.com/watch?v=wbtTcndCdP0