पावसाळा म्हटला की पावसाची गाणी, कविता आणि सोबत चहा किंवा कॉफीचा कप. असच वातावरण सध्या सगळीकडे आहे. कारण पावसाच्या सरी कोसळत आहेत त्यातच या वातावरणात दिग्दर्शक रवी जाधव यांना त्यांच्या एका गाण्याची आठवण झाली आहे.
जवळपास सहा वर्षांपूर्वी रवी जाधव यांचं साजणी हे गाणं प्रदर्शित झालं होतं. जे रवी जाधव यांनी लिहीलं होतं आणि शेखर रवजियानी यांनी कम्पोज आणि गायलं होतं. शिवाय गायिका बेला शेंडे यांचीही साथ या गाण्याला होती. शेखर रवजियानी यांच्यावर हे गाणं चित्रीत करण्यात आलं होतं. याच गाण्याची आठवण रवी यांना झाली आहे. पावसाचा आनंद लुटत हे गाणं ऐका अशी सोशल मिडीयावर त्यांनी पोस्ट केली आहे. ते या पोस्टमध्ये लिहीतात की, "गमती गमती मध्ये शेखर रवजियानी आणि मी स्टुडिओत बसल्या बसल्या १५ मिनीटांत तयार केलेले हे गाणे एव्हडे प्रचंड लोकप्रिय होईल असे वाटले नव्हते. हे गाणे लिहीताना शेतकऱ्याची पहिली प्रेयसी म्हणजे पावसाची पहिली धारा ही कल्पना मनात होती. आज सगळीकडे पाऊस पडतोय. त्यामुळे मस्त चहा किंवा काॅफी चा कप भरा आणि पुन्हा ऐका... साजणी"
तेव्हा रवी जाधव यांची पोस्ट पाहून पावसाची मजा लुटत कित्येक जण घरात बसून पुन्हा एकदा या गाण्याचा आनंद लुटत असतील यात शंका नाही.