अभिनेता सुबोध भावे हा मराठी सिनेसृष्टीतील एक गुणी आणि आघाडीचा अभिनेता. अनेक दर्जेदार भूमिका साकरत त्याने प्रेक्षकांच्या मनात राज्य केलं आहे. पण नुकतीच एक खेदजनक बाब समोर आली आहे ते म्हणजे, सुबोध भावेसोबत भेट घडवून आणण्याच्या नावे पैसे उकळण्याचा घाट घातल्याचे उघडकीस आले आहे आणि याबाबतची माहिती खुद्द सुबोध भावेने आपल्या चाहत्यांना दिली आहे. या निंदनीय प्रकाराचा खुद्द सुबोधनेच जाहीर निषेध केला आहे.
एका फेसबुक पोस्टद्वारे सतर्क राहण्याचा इशारा देत सुबोधने चाहत्यांसमोर अशा प्रलोभनांना बळी न पडण्याचं आवाहन केलं आहे. मला भेटण्यासाठी कोणालाही पैसे देण्याची अजिबात आवश्यकता नाही. “माझा सख्खा भाऊ "सूनीत " सोडून "भावे" आडनाव लावणारा माझा कोणीही भाऊ नाही आणि जर कोणी मला भेटवण्यासाठी पैसे किंवा अन्य मागणी करत असेल तर अशा कोणावरही विश्वास ठेऊ नका.” तुमचाच सुबोध सुरेश भावे.
आजकाल आपल्या आवडत्या सेलिब्रिटीला भेटण्यासाठी त्याच्यासोबत सेल्फी आणि फोटो काढण्यासाठी चाहते आतुर असतात. त्यामुळे चाहते आणि सेलिब्रिटी यांची भेट घडवून देण्यासाठी आजकाल असे फसवणुकीचे प्रकार सर्रास सुरु आहेत. चाहत्यांनी स्वत: दक्ष राहून अशा भूलथापांना अजिबात बळी पडू नये.
https://twitter.com/subodhbhave/status/1086972274341748738