By  
on  

शिवाजी पार्कमध्ये रंगला 'मी पण सचिन' सामना

ज्या शिवाजी पार्कच्या मैदानावर आपला सगळ्यांचा लाडका 'मास्टरब्लास्टर' सचिन तेंडुलकर घडला, त्याच मैदानावर क्रिकेट खेळण्याची 'मी पण सचिन' चित्रपटाच्या टीमची असलेली इच्छा आज पूर्ण झाली. लवकरच 'मी पण सचिन' हा क्रिकेटवर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ध्येयाने झपाटलेल्या एका महत्वाकांक्षी तरुणाची कथा या सिनेमात दाखवण्यात आली आहे.

'क्रिकेटची पंढरी' अशी ओळख असणाऱ्या लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर क्रिकेट खेळण्याचे स्वप्न सिनेमातील नायक म्हणजेच स्वप्नील जोशीचे असते. त्याचे हे स्वप्न पूर्ण होते, की नाही हे जाणून घेण्यासाठी आपल्याला चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट पाहावी लागेल. तत्पूर्वी या सिनेमाच्या संपूर्ण टीमने आज शिवाजी पार्कवर क्रिकेट खेळण्याचे त्यांचे स्वप्न सत्यात उतरवले आहे. ते देखील प्रकाश जाधव क्रिकेट अकॅडमीच्या विद्यार्थ्यांसोबत सामना खेळत. प्रकाश जाधव क्रिकेट अकॅडमीच्या खेळाडूंवर मात करत, त्यांनी हा अटीतटीचा सामना जिंकलासुद्धा. या वेळी दिग्दर्शक श्रेयश जाधव 'मॅन ऑफ दि मॅच' तर स्वप्नील जोशी 'सर्वोत्कृष्ट गोलंदाज' ठरला. या मॅचमध्ये प्रियदर्शन जाधव, अभिजित खांडकेकर आणि कल्याणी मुळे यांनी सहभागी होऊन मॅचची रंगत अधिकच वाढवली.

सामना संपल्यावरही 'मी पण सचिन'च्या टीमने या मुलांसोबत वेळ घालवला. एकंदरच शिवाजी पार्कच्या मैदानात आज एकदम उत्साहपूर्ण वातावरण होते. सर्वसामान्य घरातून आलेली ही मुले अतिशय उत्कृष्ट क्रिकेट खेळतात, त्यात आम्हाला भावी भारतीय टीम दिसते, अशी कौतुकाची थाप या वेळी 'मी पण सचिन' च्या टीमने दिली. या टीमला 'मी पण सचिन च्या टीमतर्फे प्रोत्साहनपर सिझन बॅट भेट म्हणून दिली. सोबतच त्यांना 'डोन्ट स्टॉप चेसिंग युअर ड्रीम' असा सकारात्मक विचार असलेला प्रेमळ सल्लाही दिला.

इरॉस इंटरनॅशनल आणि एव्हरेस्ट इंटरटेंटमेन्ट प्रस्तुत आणि गणराज असोसिएट निर्मित या चित्रपटाचे नीता जाधव, गणेश गीते, संजय छाब्रिया आणि निखिल फुटाणे निर्माते आहेत. तर चित्रपटाचे लेखन श्रेयश जाधव यांनी केले आहे. १ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणाऱ्या 'मी पण सचिन' या चित्रपटाचे इरॉस इंटरनेशनलद्वारे जागतिक स्तरावर देखील वितरण केले जाणार आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive