By  
on  

अंबरनाथ फिल्म फेस्टिवलमध्ये 'एक होतं पाणी'ने मारली बाजी

दर्जेदार निर्मितीमूल्य, उत्तम कथानक आणि प्रतिभावान कलाकार यांचं समीकरण एकदा जुळून आलं की सुजाण रसिक-प्रेक्षकांच्या कौतुकाची थाप ठरलेलीच. ह्या कौतुकाला पारितोषिकांनी चारचाँद लावले तर क्या बात है. प्रभावी कथेला प्रेक्षक नेहमीच मनापासून दाद देतात ही बाब लक्षात घेत, मराठी चित्रपटसृष्टीला प्रोत्साहन मिळावे या हेतूने अंबरनाथमधील ‘अंबरभरारी’ संस्थेने सुरु केलेल्या 'अंबरनाथ चित्रपट महोत्सवा'मध्ये यंदा 'न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज' व 'काव्या ड्रीम मुव्हीज' प्रस्तुत ‘एक होतं पाणी' या चित्रपटाला ६ नामांकनं जाहीर झाली होती त्यापैकी २ पुरस्कारांवर म्हणजेच 'सर्वोत्कृष्ट कथा-आशिष निनगुरकर' आणि 'सर्वोत्कृष्ट बालकलाकार चैत्रा भुजबळ' असे दोन पुरस्कार पटकावत महोत्सवात बाजी मारली.

अलीकडे मराठी चित्रपटांमध्ये आलेलं नावीन्य प्रेक्षकांना आपल्याकडे आकर्षित करू लागलेत. 'एक होतं पाणी' हा चित्रपट अशाच एका ज्वलंत सामाजिक विषयाला हात घालतो. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून एका दुष्काळग्रस्त गावाची गोष्ट या सिनेमातून मांडण्यात आली आहे.

प्रत्येकाने पाण्याचा प्रश्न गंभीर होईपर्यंत वाट न पाहता पाणी वाचवले पाहिजे असा संदेश यातून देण्यात आला आहे. विजय तिवारी व डॉ. प्रविण भुजबळ निर्मित व रोहन सातघरे दिग्दर्शित या चित्रपटात हंसराज जगताप, उपेंद्र दाते, अनंत जोग, जयराज नायर, गणेश मयेकर, रणजित जोग, श्रिया मस्तेकर, रणजित कांबळे, त्रिशा पाटील, आशिष निनगुरकर,शीतल कल्हापुरे, शीतल शिंगारे, आनंद वाघ, नाना शिंदे, अनुराधा भावसार, डॉ राजू पाटोदकर, राधाकृष्ण कराळे, दिपज्योती नाईक, बालकलाकार चैत्रा भुजबळ आदि कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका पाहायला मिळतील. आशिष निनगुरकर लिखित या चित्रपटाचे छायाचित्रण योगेश अंधारे यांनी केले आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive