अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री गायत्री दातार यांची प्रमुख भूमिका असलेली झी मराठीवरील 'तुला पाहते रे' ही मालिका येत्या काही महिन्यात प्रेक्षकांचा निरोप घेणार, अशा चर्चांना दोन दिवसांपूर्वीच प्रसिध्दीमाध्यमांमध्ये उधाण आलं होतं. एका यूट्यूब चॅनलशी बोलताना सुबोधने आपल्या पुढील प्रोजक्ट्स व वैयक्तिक घडामोडींबाबत काहीतरी एक वक्तव्य केलं. त्यात त्याने 'तुला पाहते रे' मालिकेचा उल्लेख केला. पण माध्यमांनी याचा विपर्यास करत ही मालिका लवकरच बंद होईल, असे सूतोवाच केले. त्यामुळे ही बातमी वा-यासारखी पसरली व लाडकी मालिका बंद होणार म्हणून प्रेक्षकांमध्ये नाराजीचा सूर उमटला. पण आता या सर्व रामायणावर आता खुद्द सुबोधनेच सोशल मिडीयावर खुलासा केला आहे.
'तुला पाहते रे' मालिका अकाली प्रेक्षकांचा निरोप घेणार, या धांदात अफवा असल्याचं सुबोध भावेने स्पष्ट केलं आहे. तो म्हणतो, "काही अफवांच स्पष्टीकरण. ज्या मालिकेने मला भरभरून प्रेम आणि आशीर्वाद दिला. झी मराठी आणि आमच्या निर्मात्यांनी पुन्हा तुमच्या समोर यायची संधी दिली. ती मालिका "तुला पाहते रे" मी सोडत नाहीये किंवा ती मालिका अकाली बंद ही होत नाहीये. रोज तुम्हाला भेटायला येत राहीन."
https://twitter.com/subodhbhave/status/1088041984818843648