लॉकडाउनमुळे मनोरंजन विश्वाचं काम ठप्प झालं होतं. काम बंद झाल्याने तीन महिने कलाकार आणि तंत्रज्ञ यांना अडचणींना सामोरं जावं लागलं होतं. त्यातच कलाकारांना 90 दिवसांनी मानधन मिळत असल्याने दैनंदिन गरजा भागवण्यात निर्माण होणाऱ्या अडचणी समोर येत होत्या. अभिनेत्रीने हेमांगी कवीने याचविषयी एक पोस्ट सोशल मिडीयावर केली होती. कलाकारांच्या मानधनाविषयीची ही पोस्ट होती.
आधीच लॉकडाउनमुळे काम बंद होते मात्र काम सुरु झाल्यावरही 90 दिवसांनी मानधन मानधन मिळणार हा महत्त्वाचा मुद्दा समोर आला होता. म्हणूनच तंत्रज्ञ आणि कलाकारांना दर महिन्याला पैसे देण्याची मागणी ‘सिने अॅण्ड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन’ने निर्मात्यांकडे केली होती. ‘इंडियन फिल्म अॅण्ड टीव्ही प्रोडय़ुसर्स कौन्सिल’तर्फे ब्रॉडकास्टर्सशी नुकत्याच झालेल्या बैठकीत 90 दिवसांनी मानधन देण्याची पद्धत बदलून तीस दिवसांनी मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात तीस दिवसांनी पैसे देण्याची मागणी वाहिन्यांनी आता मान्य केली आहे. एका प्रसिद्ध वेब पोर्टलने दिलेल्या माहितीनुसार ही बातमी समोर आली आहे. मात्र हे काही कालावधीसाठी असणार आहे. सुरुवातीचे सहा महिने तीस दिवसांनी मानधन मिळेल त्यानंतर पुन्हा 90 दिवस म्हणजेच तीन महिन्यांनी मानधन दिलं जाणार आहे. अशी माहिती निर्माते नितीन वैद्य यांनी दिली आहे.
अभिनेत्री हेमांगी कवी देखील या बातमीने आनंदी आहे. तिच्या पोस्टची दखल घेतली असल्याचा तिला आनंद आहे.