ठाकरे सिनेमाचं प्रदर्शन अवघ्या एका दिवसावर आलं असताना सिनेमाच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांमध्ये मात्र चांगलीच जुंपली आहे.
सिनेमाच्या प्रिमिअरला योग्य मान ना मिळाल्याने दिग्दर्शक अभिजीत पानसे सिनेमा अर्ध्यावर सोडून निघून गेले होते. सिनेमा हॉलच्या बाहेर या द्वयीमध्ये वादही झाला. त्यामुळे सध्या सिनेसृष्टीत जवळपास 2 गट पडल्यात जमा आहेत. सिनेमाचे दिग्दर्शक म्हणून अभिजीत पानसेना योग्य मान न मिळाल्याने त्यांच्या बाजूने एक वर्ग उभा राहिला आहे. पानसे यांच्या समर्थनार्थ #Isupportabhijeetpanase हा हॅशटॅगही सोशल मिडियावर ट्रेंड करत आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांच्या एका ट्वीटने लक्ष वेधून घेतलं आहे. राऊत यांच्या ट्वीट्मध्ये उल्लेख सिनेमाचा असला तरी निशाना पानसे यांच्यावर असल्याचं बोललं जात आहे. राऊत आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात, ‘लहान मेंदूत अहंकाराचा कचरा साचला की संयम आणि कृतज्ञता या शब्दांचे मोल नष्ट होते. ठाकरे चित्रपटाचा हाच संदेश आहे’.
अभिजीत पानसे हे मनसे नेते असल्यानेच त्यांना प्रिमिअरमधून डावललं गेलं असा आरोपही राऊत यांच्यावर करण्यात येत आहे. आता या ट्वीटवरून पुन्हा मनसे आणि शिवसेना यांच्यात जुंपण्याची शक्यता आहे.