सत्या 2’, ‘मन्या दि वंडरबॉय’, ‘332 मुंबई टू इंडिया’, ‘राजवाडे अँड सन्स’ यासारख्या मोजक्या पण गाजलेल्या हिंदी व मराठी चित्रपटांतून महत्त्वाच्या भूमिका करत आपल्या अभिनय कौशल्याने अल्पावधीतच लक्ष वेधून घेणारा मराठी चित्रपटसृष्टीतला देखणा चेहरा म्हणजे अमित्रियान पाटील. ‘आसूड’ या आगामी मराठी चित्रपटातून पुन्हा एकदा आपल्या भेटीला येत आहे. या चित्रपटात एका कणखर रांगड्या शेतकरी युवकाची मध्यवर्ती भूमिका अमित्रियान साकारत आहे.
‘आतापर्यंत मी पडद्यावर ज्या भूमिका केल्या आहेत, त्यापेक्षा ही वेगळी भूमिका आहे. आजच्या पिढीचं प्रतिनिधीत्व करणारी डॅशिंग भूमिका मी यात साकारली आहे. ‘शिवाजी पाटील’ असे या व्यक्तिरेखेचे नाव असून शिक्षणाने बीएससी अॅग्रीकल्चर असणारा शिवाजी शेती व्यवसायाचा तिरस्कार करत असतो परंतु कालांतराने काही घटना अशा घडतात की, शिवाजीला शेतकऱ्यांच्या हितासाठी व्यवस्थेविरोधात ‘आसूड’ ओढावा लागतो. व्यवस्थेविरोधात लढण्याचे आव्हान तो पेलतो का? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी प्रत्येकाने चित्रपटगृहात जाऊन ‘आसूड’ पहायला हवा.
अमित्रीयान सोबत या चित्रपटात विक्रम गोखले, प्रदीप वेलणकर, माधव अभ्यंकर, अनंत जोग, दीपक शिर्के, उपेंद्र दाते, संदेश जाधव, कमलेश सावंत, राणा जंगबहादूर, अवतार गील या नामवंत कलाकारांसोबत रश्मी राजपूत हा नवा चेहरा दिसणार आहे. 'व्यवस्था बदलायला पाहिजे' यासाठीचा जबरदस्त आत्मविश्वास आजच्या पिढीत आहे. आणि या तरुण पिढीने मनात आणलं तर ते ही व्यवस्था नक्कीच बदलू शकतात हे सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न‘आसूड’ या चित्रपटातून केला आहे.
गोविंद प्रोडक्शन प्रस्तुत ‘आसूड’चित्रपटाची निर्मिती डॉ.दीपक मोरे यांची असून सहनिर्मिती विजय जाधव यांची आहे. लेखन व दिग्दर्शन निलेश रावसाहेब जळमकर तर सहदिग्दर्शन अमोल ताले यांचे आहे. कथा–पटकथा-संवाद निलेश रावसाहेब जळमकर व अमोल ताले यांचे आहेत. छायांकन अरुण प्रसाद तर संकलन सचिन कानाडे यांचे आहे. येत्या ८ फेब्रुवारीला ‘आसूड’ प्रदर्शित होणार आहे.