कोरोनाग्रस्त परिस्थितीत झालेल्या लॉकडाउनचा परिणाम विविध क्षेत्राला भोगावा लागला. यात मनोरंजन क्षेत्राचही काम ठप्प झालं होतं. चित्रीकरण बंद झाल्याने कलाकार आणि तंत्रज्ञ या सगळ्यांना घरी बसावे लागले होते. मात्र जुलै महिन्याच चित्रीकरणाला सुरुवात करण्यात आली. मात्र त्यातही सरकारतर्फे अनेक बंधने घातली गेली.यात महत्त्वाची अट अशी आहे की 65 वर्षावरील ज्येष्ठ कलाकारांना शुटिंगच्या सेटवर प्रवेश वर्ज करण्यात आलाय.
सुरुवातीला ज्येष्ठ कलाकारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्वांनी ते मान्यही केलं. पण मात्र हे दिवस वाढत असल्याने ज्येष्ठ कलाकारांना या त्रासाला सामोरं जावं लागतय. ही अट फक्त कलाकारांसाठीच नाही तर अनेक मालिकांसाठी आणि निर्मात्यांसाठी देखील अडचणीची ठरतेय. आणि या पार्श्भूमिवर 'डॉक्टर डॉन' या मालिकेत मॉडर्न आजीची भूमिका साकारणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी शासनाच्या या अटीचा निषेध व्यक्त केला आहे. त्या याविषयी म्हणतात की, "सुरुवातीला मी घरातून शूट करण्याचा प्रयत्न केला पण त्या शूट ला मजा आली नाही. आमची टीम माझी योग्य काळजी घ्यायला तयार आहे . मी सुद्धा सेट वर जाऊन काम करायला फिट आहे. या नियमामुळे मला घरी बसून सगळं करावं लागतय. मला फार त्रास होतोय याचा. मुळात ६५ वयावरील व्यक्तिंवरच हे बंधन कसे काय. ६४ वयाची व्यक्ती काम करु शकते असं असेल तर ६४ आणि ६५ या वयांमध्ये फरक तो काय असतो हे आम्हाला समजवावे शिवाय कलाकारांवरच ही बंधनं का म्हणजे मग ती व्यक्ती जर मनोरंजन क्षेत्राशिवाय दुसऱ्या कुठच्या क्षेत्रामध्ये काम करत असेल तर ती सुरक्षित आहे का हा ही प्रश्न आहेच की. ''
या विधानासह त्यांनी त्यांचा निषेध व्यक्त केला आहे. अभिनय क्षेत्र हे अनेक कलाकरांचे उपजीविकेचे सुद्धा एकमेव साधन आहे त्यामुळे ते बंद असल्याने विविध अडचणींना काही कलाकारांना सामोरं जावं लागतय. शिवाय सरकारच्या या वयोमर्यादेच्या अटीमुळे बऱ्याच मालिकांमधील ज्येष्ठ कलावंत साकारत असलेली पात्रं मालिकांमधून गायब झालेली पाहायला मिळत आहेत.