कोरोनाग्रस्त परिस्थिती आणि लॉकडाउनवर आधारित विविध जाहिराती सध्या पाहायला मिळत आहेत. यातच एक नवी जाहिरात समोर आली आहे. या जाहिरातीत अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे पाहायला मिळत आहेत. गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर आहे मात्र यंदा हा उत्सव दरवर्षीप्रमाणे नसून विविध नियमांचं पालन करून साजरा करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर एक जाहिरात आहे.
नुकतच अभिनेता सिद्धार्थ जाधवने या जाहिरातीचा व्हिडीओ शेयर करत त्याची भावना व्यक्त केली आहे. या जाहिरातीच्या निमित्ताने सिद्धार्थने पहिल्यांदाच डॉ. मोहन आगाशे यांच्यासोबत काम केलं आहे. मात्र या निमित्ताने आणखी एक महत्त्वाची गोष्ट घडली आहे ती म्हणजे या जाहिरातीत सिद्धार्थ एम एस धोनीच्या 7 नंबर जर्सीमध्ये दिसतोय. नुकतच धोनीने आंतरराष्ट्री क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. हे सगळं या जाहिरातीच्या निमित्तानं जुळून आल्याचं सिद्धार्थ त्याच्या पोस्टमध्ये सांगतो.
सिद्धार्थ या पोस्टमध्ये लिहीतो की, "अवघे धरू सुपंथ! मला जेंव्हा जेंव्हा चांगल्या प्रोजेक्टचा भाग होण्याची संधी मिळत असते.. तेंव्हा तेंव्हा मी ती शक्यतो कधीच सोडत नाही... यंग आणि एका वेगळ्याच प्रतिभेनं स्वतःच्या विलक्षण दिग्दर्शन शैलीची मराठी मनावर छाप पाडणारा दिग्दर्शक वरूण नार्वेकर याच्यासोबत काम करण्याची संधी धन्यवाद वरुण नार्वेकर किती सहज आणि सुंदरपणे काम करत असतो ते अनुभवायला मिळालं... डॉ. मोहन आगाशे सर म्हणजे आणखी एका दिग्गज सिनियर आर्टिस्ट सोबत पहिल्यांदाच काम करण्याची संधी समोर असं कोणी असलं की एक वेगळीच नवी ऊर्जा मला मिळते. धन्यवाद डॉ. मोहन आगाशे सर आणि जुळून आलेला योगायोग... म्हणजे आवडत्या धोनी ची ७ नंबरची जर्सी घालून अभिनय करण्याची संधी प्रिय एम एस धोनी तुला मनापासून सलाम हे सगळं जुळून आलं ते चितळेंच्या या जाहिरातीनं... चाळीतल्या गल्लीगल्लीतुन पोरांसोबत "कार्यकर्ता" म्हणून केलेली सगळी कामं आठवली.या निमित्ताने महाराष्ट्रातल्या सगळ्या गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांना मनापासून सलाम... खरंच यावर्षीचा गणपती पाच महिन्यांपूर्वीच बसल्यासारखं जाणवतय..गणपती बाप्पा मोरया!!!!"
दिग्दर्शक वरुण नार्वेकर यांनी केलेल्या या जाहिरातीचा भाग होऊन झालेला आनंद सिद्धार्थने त्याच्या या पोस्टमध्ये व्यक्त केला आहे. शिवाय यातील अभिनयाने सिध्दार्थने त्याच्या चाहत्यांची मनंही जिंकली आहेत.