सध्या काही मराठी कलाकारांचा कल हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे वळताना दिसतोय. यातच मराठी मनोरंजन विश्वातील आणखी काही कलाकारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. यात अभिनेत्री सविता मालपेकर, माया जाधव, ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर, लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता प्रियदर्शन जाधव, लेखक कौस्तुभ सावरकर, दिग्दर्शक संतोष भांगरे, अभिनेते गिरीश परदेशी, बाळकृष्ण शिंदे, निर्माता शाम राऊत, अभिनेते डॉ. सुधीर निकम, उमेश बोळके, मोहित नारायणगावकर यांनी प्रवेश घेतला.
यावेळी अभिनेते विजय पाटकर, प्रियदर्शन जाधव, सविता मालपेकर यांच्या प्रवेशा दरम्यानचे फोटो समोर आले आहेत.
यावेळी कलाकारांनी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत मुंबई प्रदेश कार्यालयात जाहीर प्रवेश केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे, आरोग्य मंत्री राजेश टोपे देखील उपस्थित होते.या कलाकारांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील सांस्कृतिक कामांना जोर मिळण्याची शक्यता आहे.
काहीच दिवसांपूर्वी अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनीदेखील या पक्षात प्रवेश घेतला होता.