By  
on  

मालिका निर्माते आणि वाहिन्यांच्या संचालकांना मनसेचा इशारा

'आई माझी काळूबाई' या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान कोरोनाची लागण झाल्याने ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर या प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन झालं. याची दखल घेत आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मालिका निर्माते आणि वाहिन्यांच्या संचालकांना इशारा दिला आहे. मालिकांच्या चित्रीकरणाच्या सेटवर कोव्हिड प्रोटोकॉलचे पालन करण्यात हलगर्जीपणा न करण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी इशारा दिला आहे.

'आई माझी काळूबाई' या मालिकेच्या सेटवर इतरही 27 मेम्बर्सनाही कोरोनाची लागण झाली आहे. याच पार्श्वभूमिवर आता मनसे पुढे सरसावली आहे. आणि असा हलगर्जीपणा पुन्हा होऊ नये यासाठी त्यांनी इशारा दिला आहे.  

 

नुकत्याच जारी केलेल्या या पत्रकात असं सांगीतलं गेलय की, "टीव्ही मालिकेचे चित्रिकरण सुरु असताना ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांच्यासह २७ जणांना कोरोनाची लागण झाली. मात्र तरीही मालिकेचे चित्रीकरण सुरुच राहिले आणि त्याचाच परिणाम म्हणून ७९ वर्षीय आशालता यांचे निधन झाले. आज पहाटे आशालता यांची प्राणज्योत मालवली.राज्यातील लाॅकडाऊनमुळे गेले अनेक महिने मालिका तसंच सिनेमांचे चित्रिकरण पूर्णपणे बंद होते. मनोरंजन सृष्टीतील अनेक नामवंतांनी चित्रिकरणास सशर्त परवानगी मिळावी अशी मागणी वारंवार केल्यामुळे अखेर राज्य सरकारने कोविड प्रोटोकाॅलचे पालन करून शूटिंग करण्याची अट निर्मात्यांना घातली होती.दुर्दैवाने, मराठी तसंच हिंदीतील विविध मनोरंजन वाहिन्यांचे संचालक आणि मालिकांचे निर्माते कोविड प्रोटोकाॅलला पुरेशा गांभीर्याने घेत नसल्याचं आमच्या निदर्शनास आलं आहे. ज्येष्ठ अभिनेत्री आशालता ज्या मालिकेत काम करत होत्या, त्या सेटवर कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्यात हलगर्जीपणा झाला आहे का, याची चौकशी प्रशासन करेलच, मात्र आपल्या मनोरंजन वाहिनीच्या तसंच निर्मितीसंस्थेच्या मालिकांच्या सेटवर कोविड प्रोटोकाॅलचे सर्वतोपरी पालन करणे, ही आपली वैयक्तिक जबाबदारी आहे. याचं भान प्रत्येक मनोरंजन वाहिनीने तसंच मालिकांच्या निर्मात्यांनी बाळगायलाच हवं. कोविड प्रोटोकाॅलच्या पालनात कोणतीही तडजोड किंवा हलगर्जी केल्यामुळे जर अभिनेते आणि तंत्रज्ञ यांचा जीव धोक्यात येत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना मालिकांच्या चित्रिकरणास ठामपणे विरोध करेल."

तेव्हा अशा पद्धतिचा हलगर्जीपणा होऊ नये यासाठी मराठी तसंच हिंदीतील विविध मनोरंजन वाहिन्यांचे संचालक आणि मालिकांचे निर्माते यांना हा इशारा देण्यात आला आहे.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive