Exclusive :  मेलबर्न फेस्टची सुरुवात करणाऱ्या ‘हबड्डी’च्या दिग्दर्शकाने सांगितलं सिनेमाचं मुख्य आकर्षण, “आपल्या सगळ्यांच्या आतलं लहान मुल सिनेमात सापडेल”

By  
on  

23 ऑक्टोबर रोजी सुरु होणाऱ्या इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्नची सुरुवात ‘हबड्डी’ या मराठी आणि विद्या बालनच्या 'नटखट' या हिंदी शॉर्ट फिल्मने होणार आहे. दिग्दर्शक नचिकेत सामंतने 'हबड्डी' या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 'हबड्डी' या सिनेमाच्या मेलबर्न फेस्टिवहलच्या स्क्रिनींग निमित्ताने पिपींगमून मराठीसोबत नचिकेतने एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आहे. 
या मोठ्या फेस्टिवलसाठी या सिनेमाची निवड झाल्याने नचिकेतने त्याच्या प्रतिक्रिया यावेळी शेयर केल्या. तो म्हणतो की, “फेस्टिव्हलसाठी उत्सुक आहे कारण या फिल्मचा खूप लांब प्रवास आहे.  दोन वर्षांपासून आम्ही ही फिल्म बनवतोय. व्हीएफएक्स खूप आहेत या सिनेमात. मराठी सिनेमात इतके व्हीएफएक्स सहसा नसतात, म्हणून जरा वेळ लागला. त्याच्यानंतर अचानक लॉकडाउन सुरु झालं. आणि वर्षभर थांबून आता हा सिनेमा फेस्टिवहपर्यंत पोहोचतोय त्यासाठी उत्सुक आहोत. सुरुवातीला मी सरप्राईज झालो होतो. खूप छान वाटतं होतं विद्या बालनच्या सिनेमासोबत ओपनिंग फिल्म आणि इतक्या मोठ्या फेस्टिवलमध्ये ओपनिगं फिल्म असणं ही खूप मोठी गोष्ट आहे. जेव्हा बातमी आली तेव्हा कळतच नव्हतं काही आणि मी दुसऱ्या सिनेमाच्या कामात होतो. ही माझ्या खूप जवळची फिल्म आहे. या फिल्मसोबत बराच काळ काढलाय. लिहीतानाही सलग लिहीलं नव्हतं त्याची मोठी प्रोसेस होती आणि मोठा प्रवास होता. आता खूप छान वाटतय.”


या सिनेमाविषयीची एक खास लक्षवेधी गोष्टही नचिकेतने या निमित्ताने सांगितली. तो सांगतो की, “आपल्या सगळ्यांच्या आतलं लहान मुल या सिनेमात सापडेल. मोठं होत होत आपणं जे विसरून जातो ना ते पाहायला मिळेल. लहान मुलांच्या विचाराचं स्वातंत्र्य जे आहे त्या भावनेशी सगळे रिलेट करतील.”

या सिनेमाच्या हबड्डी या हटके टायटल आणि कहाणी विषयी ही नचिकेत भरभरून बोलला. “आम्हाला शंका होती की हे टायटल कुणाला कळेल की नाही. मजेदार वाटतं हे ऐकायला पण त्या टायटल ठरावीक असा काही अर्थ नाही. पण एखादा तोतरा मुलगा असेल तर तो कबड्डी कसा म्हणेल तो उच्चार म्हणजे हबड्डी आहे. कबड्डी हा महत्त्वाचा भाग आहे सिनेमाचा पण ही स्पोर्ट्स फिल्म नाही. ही एका अनाथ मुलाची गोष्ट आहे. गावातल्या मुलांनी त्याला छळलेलं आहे. पण तो तोतरा असल्याने त्याला कबड्डी म्हणायलाच त्रास होऊ शकतो असा या मागचा विचार आहे. या सिनेमाच्या चित्रीकरणा दरम्यान आम्ही पूर्ण गावाला निळा रंग दिला होता. त्यात एका शापीत विहीरही आहे. हा एकटा मुलगा त्या विहीरीत उडी मारून खेळणं शोधताना आहे. पाण्याचा भाग आम्ही स्विमींग पुलमध्ये शूट केला. मात्र याच्या व्हीएफएक्सला प्रचंड वेळ गेला. ही मजेशीर प्रोसेस होती.”
या सिनेमात बालकलाकार करण दवे मुख्य भूमिकेत आहे. त्याच्यासोबत या सिनेमाचा प्रवास कसा होता याविषयीही नचिकेतने सांगितलं. “करणसोबत अंडरवॉटर सीन चित्रीत करणं चॅलेंजिंग होतं शिवाय त्यातून होमवर्क आणि प्लॅनिंगचा धडाही आम्हाला मिळाला. मराठीत बजेट कमी असतं त्यानूसार करण्याचा प्रयत्न केला. अंडरवॉटर सीनसाठी त्याला स्कुबा डायविंगचे धडे दिले. त्याने ते ट्रेनिंग घेतलं आणि त्याने व्यवस्थित केलं.”

या फेस्टिवलचा सिनेमाला होणारा फायदा आणि आगामी काळात या सिनेमाच्या प्रदर्शनावरही नचिकेत बोलला. त्याने सांगितलं की, “फेस्टिवल्समध्ये गेल्यामुळे या फिल्म्सना रिस्पेक्ट मिळतो. जेव्हा ते रिलीजसाठी येतात ना तेव्हा खूप फायदा होतो. या संधी फेस्टिवल्सच्या निमित्ताने मिळतात तेव्हा खूप चांगलं वाटतं. आमची सगळ्यांची इच्छा हीच आहे की सिनेमागृहातच ही फिल्म रिलीज करायची. मात्र आता सिनेमागृह सुरु होत असताना बरीच स्पर्धा असणार आहे. त्या सगळ्या रेसमध्ये आपण कुठे हरवुन जाणार माहिती नाही. ही सगळी गणितं कशी बसतात ते पाहावं लागेल. पण आमच्या सगळ्यांची हीच इच्छा आहे की सिनेमागृहात रिलीज करायचं आहे. त्यासाठी प्रयत्नही सुरु आहेत.”  
तेव्हा फेस्टिवलमध्ये या सिनेमाला कसा प्रतिसाद मिळतोय त्याचबरोबर हा सिनेमा केव्हा प्रदर्शित होतोय हे पाहणंही तितकच महत्त्वाचं ठरेल.


    
 
 

Recommended

Loading...
Share