EXCLUSIVE : “प्रभुदेवाचा मी मुकाबला पासून चाहता”, ‘राधे’ चित्रपटाविषयी बोलताना कोरोनाच्या भयावह परिस्थितीविषयी बोलला सिध्दार्थ जाधव

By  
on  

नाटक, मालिका, रिएलिटी शो आणि चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा अभिनेता सिध्दार्थ जाधव हा लवकरच ‘राधे’ या आगामी हिंदी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच ‘राधे’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि ट्रेलरमध्ये सिध्दार्थचीही झलक पाहायला मिळाली. सिध्दार्थला या ट्रेलरमध्ये पाहुन त्याच्या चाहत्यांनाही प्रचंड आनंद झाला आहे. 
नुकतच पिपींगमून मराठीसोबत सिध्दार्थ जाधवने एक्सक्लुझिव्ह बातचीत केलीय. यावेळी त्याने ‘राधे’ हा आगामी चित्रपट, प्रभुदेवासाठी असलेलं त्याचं प्रेम आणि सध्याची कोरोनाची भयावह परिस्थिती या सगळ्या गोष्टींवर प्रकाश टाकला आहे.
राधेविषयी सांगताना सिद्धार्थ म्हणतो की, “प्रभुदेवासारखा दिग्दर्शक त्यात ही फिल्म सलमानची आहे म्हटल्यावर यात काहीतरी इंटरेस्टिंग करायला मिळालय याचा आनंद आहे. प्रभुदेवाचा मी मुकाबला पासून चाहता आहे. शाळेत असतानाही त्याचा डान्स पाहुन मी बॅक फ्लिप मारायला शिकलो होतो. कॉमेडी सर्कस या कार्यक्रमाच्या एका भागात प्रभुदेवा पाहुणा म्हणून आले होते. मी त्यांच्यासोबत आवर्जुन फोटो काढला. माझ्यासारख्या कलाकारासाठी असे काही खास क्षण असतात. एक चांगली संधी होती म्हणून मी हा सिनेमा केलाय. त्या ट्रेलरमध्ये मी कुठे असेन हे देखील मला अपेक्षित नव्हतं पण त्यात स्वत:ला पाहुन मला आनंद आहे. त्यात एक छोटीशी झलकही आपल्या लोकांना आवडली त्याचाही मला आनंद आहे. यातील माझी भूमिका इंटरेस्टिंग आहे.”


लंडनमध्ये ‘लोच्या झाला रे’चं चित्रीकरण करत असताना या सिनेमासाठी विचारणा झाल्याचं सिद्धार्थ सांगतो. याशिवाय सलमानने ‘दे धक्का’ हा सिनेमाही पाहिला असल्याने सलमान सिद्धार्थला चांगला ओळखत असल्याचं तो म्हणतो. मात्र भूमिकेविषयीची उत्सुकता कायम राहण्यासाठी सिद्धार्थने तो साकारत असलेल्या भूमिकेविषयी जास्त माहिती अद्याप समोर आणली नाही.
रोहीत शेट्टीच्या ‘गोलमाल’, ‘सिम्बा’ या सिनेमांमध्ये सिद्धार्थने कमाल काम केलय. तर आता रोहीत शेट्टीच्या आगामी ‘सर्कस’ या सिनेमातही सिद्धार्थ झळकणार आहे. मात्र या सिनेमाविषयी अद्याप बोलता येणार नसल्याचं तो सांगतो. सर्कस या सिनेमाविषयी बोलण्यासारखं भरपुर काही आहे पण त्याविषयी काहीच रिव्हील करता येण्यार नसल्याचं तो म्हटला.
 
सध्याची कोरोनाग्रस्त परिस्थिती ह्दय हेलावुन टाकणारी आहे. या परिस्थितीचं गांभीर्य सिद्धार्थला आहे. म्हणूनच ही परिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्राचा नागरीक म्हणून विविध पद्धतिने सिद्धार्थनेही मदतीचा हात पुढे केलाय.
सिद्धार्थ सांगतो की, “मी कलाकार आहे हे बाजुला ठेवून मी सध्या बाप, मुलगा, पति आणि सिद्धार्थ जाधव आहे. सध्याच्या परिस्थितीत घरात राहणं गरजेचं आहे कारण बाहरेची परिस्थिती खूप भयानक आहे. मी राधेच्या ट्रेलरमध्ये झळकलो ते पाहुन लोकांना आनंद मिळाला, त्याचा आनंद आहेच. पण महाराष्ट्राचा नागरीक म्हणून माझ्यावर जी जबाबदारी आहे त्यातून मी जी मदत करतो ते मला सांगायचं नाही. पण प्रत्येक मराठी कलाकार ते करतोय. सध्या जागरुकता निर्माण करणं महत्त्वाचं आहे. मागील आठवड्यांमध्ये मराठी इंडस्ट्रीतील दोन दिग्गज कलाकार आपल्यातून गेले. सुमित्रा भावे, किशोर नांदलस्कर, भारुडरत्न निरंजन भाकरेंचंही निधन झालं. हे सगळं ऐकून सध्या खूप भितीदायक वातावरण निर्माण झाल्याचं चित्र आहे. मला पिपींगमून मराठीच्या माध्यमातून हे सागायचयं की, जीवनावश्यक गोष्टींसाठी लोकं बाहेर पडत आहेत. पण अनावश्यक बाहेर न पडता लोकांनी घरात रहावं.”

हिंदी कलाकारांनी काही केलं की मराठी कलाकारांना जाब विचारला जोता. या मुद्द्यावर सिद्धार्थ म्हणतो की, “मराठी कलाकार हे आपआपल्या पद्धतीने काम करतच असतात. मात्र जिथे हिंदी कलाकारांनी काही केलं की मराठी कलाकारांना नेहमी असा जाब विचारला जातो की मराठी कलाकारांनी काय केलं ? मराठी कलाकार हा सॉफ्ट टार्गेट असतो. सध्याच्या परिस्थितीचं भान सगळ्यांना आहे. आम्ही कलाकार नंतर आहोत सगळ्यात आधी देशाचे आणि महाराष्ट्राचे नागरीक आहोत. आत्ताच्या घडीला आमचं जे काम आहे ते आम्ही प्रामाणीकपणे करतोय.”

‘राधे’ आणि ‘सर्कस’ या हिंदी सिनेमांव्यतिरिक्त आगामी काळात अनेक मराठी सिनेमांमधून सिद्धार्थ झळकणार आहे. आत्तापर्यंत त्याने केलेल्या वैविध्यपूर्ण भूमिकांनी प्रेक्षकांचं प्रेम त्याला कायम मिळालय, आगामी काळातील त्याच्या भूमिका पुन्हा नव्याने प्रेक्षकांचं मनोरंजन करतील एवढं नक्की.   

Recommended

Loading...
Share