By  
on  

Mothers Day Exclusive : लोकप्रियता डोक्यात जाऊ नये यासाठी मृणाल कुलकर्णी यांचे विराजसवर संस्कार, तर ‘सोनपरी'मुळे विराजसला निर्माण झाली या इंडस्ट्रीची ओढ

एक आई आपल्या मुलाला जशी घडवते, शिकवते ते कोणत्याही शिकवणीत शिकवलं जाऊ शकत नाही. आणि हीच शिकवण सदैव मुलांच्या कामी येते. काळासोबत मुलांचं आईसोबतचं नातं बदलत जात असलं तरी आईची माया, मुलांचं आईसाठीचं प्रेम हे कायम असतं. अशीच एक आई-मुलाची जोडी आहे जे दोघंही मनोरंजन क्षेत्रात काम करत असल्यामुळे जास्त वेळ सोबत असणं शक्य होत नाही. अशातही या नात्यात ओढ कायम राहण्यासाठी ते विविध प्रयत्न करतात. अभिनेत्री, दिग्दर्शिका, लेखिका मृणाल कुलकर्णी आणि अभिनेता, दिग्दर्शक विराजस कुलकर्णी यांची ही जोडी आहे. पिपींगमून मराठीने मदर्स डेच्या निमित्ताने त्यांच्याशी संवाद साधलाय. यावेळी या नात्यातील बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगीतल्या. 

नाटक, मालिका आणि चित्रपट माध्यमातून विराजस गेल्या काही वर्षांपासून काम करतोय. सध्या सुरु असलेल्या ‘माझा होशील ना’ या मालिकेतून त्याला प्रचंड लोकप्रियता मिळतेय. याविषयी मृणाल सांगतात की, “मला वाटलं नव्हतं की विराजस पूर्ण वेळ अभिनेता बनेल. विराजस टिव्ही माध्यमाला स्विकारेल की नाही हे मला माहिती नव्हतं. कारण तो खूप स्वतंत्र विचारांचा मुलगा आहे. फार लहान वयापासून तो या मिडीया, फिल्ममेकिंगचं तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेतोय. थिएट्रॉन हा त्याचा स्वताचा थिएटर ग्रुप आहे. टिव्हीच्या मार्गाला तो जाईल असं वाटलं नव्हतं.  यात त्याला चांगली संधी चाऊन आली. योगायोगाने त्याला वेगळा विषय आणि उत्तम प्लॅटफॉर्म मिळालय. आता खूप लोकप्रियता आहे आणि ही लोकप्रियता डोक्यात जाऊ नये यासाठी मी केलेले संस्कार कामी येतात हे बघून खूप आनंद होतो. आईला आपलं मुल कायम छोटं वाटत असतं. मी अधूनमधून त्याच्या इन्स्टाग्रामवरील मुलींच्या कमेंट्स देखील वाचते.”

मृणाल कुलकर्णी यांनी अभिनेय क्षेत्रात आत्तापर्यंत वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. ‘सोनपरी’ या कार्यक्रमातील त्यांच काम हे लक्षवेधी ठरलं आणि आजही त्यांची ‘सोनपरी’ म्हणून ओळख कायम आहे. आईच्या चित्रीकरणाच्या सेटवर जाऊन विराजसलाही या क्षेत्राची आवड निर्माण झाल्याचं तो सांगतो.  “आईचा ‘तुझ्या माझ्यात’ हा सिनेमा खूप आवडला होता. तिने दिग्दर्शित केलेला पहिला सिनेमा प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं त्याचं काम विशेष आवडलं होतं. सोनपरी मात्र मनात खास घर करून आहे. ते माझ्या करेक्ट वयात आलं होतं. मी 10, 11 वर्षांचा असताना सोनपरी सुरु झालं होतं. तो एकमेव सेट होता जिथे मला मनापासून जायला आवडायचं. त्या सेटवर माझ्या वयाची लहान मुलं असायची. जर मी मागे वळून पाहतो तर सोनपरीमुळे बिहाइंड द कॅमेरा ड्रामा मला आवडायला लागला. तिथे स्पेशल इफेक्ट्स, क्रोमा, स्टॉप लॉक या सगळ्या गोष्टी कळायला लागल्या. आणि राजा शिवछत्रपतीच्या सेटवरही ते जाणवलं.”

विराजस लहान असताना मृणाल कुलकर्णी या त्यांच्या प्रत्येक मालिकांच्या, चित्रपटांच्या सेटवर त्याला घेऊन जात असे. याविषयी सांगताना त्यांनी महत्त्वाच्या मुद्द्यावर प्रकाश टाकला आहे.  
“विराजस माझ्या प्रत्येक मालिकेच्या प्रत्येक चित्रपटाच्या सेटवर आलाय. ग्रेट मराठाच्या वेळी विराजस अडीच वर्षांचा असेल. ज्याचं जयपुरच्या पलीकडे एका ठिकाणी चित्रीकरण सुरु होतं. त्याने तेव्हापासून हे सगळं पाहिलेलं आहे. प्रत्येक आईने आपल्या मुलाला आपल्या कामाच्या ठिकाणी घेऊन गेलं पाहिजे. म्हणजे आपली आई काय करते ?, कामाला जाते म्हणजे काय करते ?, हे प्रत्येक मुलाला कळलं पाहिजे. आई दमून येते म्हणजे काय ? आईचं कौतुक होतं, आईला अवॉर्ड मिळतं म्हणजे काय ? मग ती आई कोणत्याही क्षेत्रात काम करणारी असो. मुलांना ही जाणीव करून देणं आईचं काम आहे. त्यामुळे आईच्या कामाकडे बघण्याचा मुलांचा एक सकारात्मक आणि सुदृढ दृष्टीकोण तयार होतो.”

याशिवाय या नात्यात एकमेकांचा स्पेस जपणही तितकच गरजेच असल्याचं मृणाल कुलकर्णी सांगतात. या क्षेत्रात काम करत असताना आईला घेऊन चित्रपट दिग्दर्शित करण्याची इच्छा विराजसने यावेळी  सांगीतली. आईसोबत अभिनय करण्यापेक्षा तिला दिग्दर्शित करायची इच्छा असल्याचं विराजस सांगतो. मृणाल कुलकर्णी यांचही हे स्वप्न असल्याचं त्या म्हणाल्या. तेव्हा आगामी काळात विराजस दिग्दर्शित करत असलेल्या प्रोजेक्टमध्ये मृणाल कुलकर्णी यांचा सहभाग असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 

Recommended

PeepingMoon Exclusive