PeepingMoonExclusive : “मराठी गाण्यात त्याने नाविन्य आणलं” संगीतकार राम लक्ष्मण यांच्यासोबतच्या आठवणींना अशोक पत्कींनी दिला उजाळा

By  
on  

मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील राम लक्ष्मण हे लोकप्रिय आणि प्रसिद्ध नाव. सुरेंद्र हेंद्रे आणि विजय पाटील अशी ही राम लक्ष्मण जोडी होती. दादा कोंडके यांनी या जोडीला हे नाव दिलं होतं. या राम लक्ष्मण जोडीतील विजय पाटील यांचं निधन झालं आहे. ते 89 वर्षांचे होते. नागपुर येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  
राम लक्ष्मण यांचा सुरुवातीचा काळ लोकप्रिय, प्रसिद्ध संगीतकार अशोक पत्की यांनी जवळून पाहिलाय. ऑर्केस्ट्रासाठी ते सोबत काम करायचे. याविषयी पिपींगमून मराठीने अशोक पत्की यांच्याशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी राम लक्ष्मण यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.


ते सांगतात की, “आम्ही जेव्हा नवोदीत होतो तेव्हा ऑर्केस्ट्रापासून एकमेकांना ओळखतोय. आमचं वय जवळपास सारखच. त्या काळी आम्ही छोट्या कार्यक्रमांमध्ये एकत्र काम करायचो. मी पेटी वाजवायचो, सुरेंद हेंद्रे व्हायोलीन वाजवायचा आणि विजय अकॉर्डियन वाजवायचा. कितीतरी वर्षे आम्ही असं एकत्र काम करायचो. शोभा म्हणून आमच्या कार्यक्रमात नृत्य सादर करणारी होती, तेव्हा विजय आणि त्यांच्यात प्रेम जुळलं आणि नंतर त्यांचं लग्नही झालं.”

राम लक्ष्मण यांच्या करियरची सुरुवात ऑर्केस्ट्रानंतर मराठी चित्रपटांमधून झाली. दादा कोंडके यांच्या अनेक सुपरहीट चित्रपटांना राम लक्ष्मण यांनी संगीत दिलं होतं. ‘पांडू हवालदार’, ‘तुमचं आमचं जमलं’, ‘राम राम गंगाराम’, ‘बोट लावीन तिथं गुदगुल्या’, ‘आली अंगावर’ या आणि अनेक मराठी चित्रपटांसाठी त्यांनी संगीत दिलय. मराठीतून नंतर हिंदीत काम करताना ते नावारुपाला आले, याचा अभिमान वाटल्याचं अशोक पत्की सांगतात, “दादा कोंडके यांच्या चित्रपटांपासून त्याच्या कामाला सुरुवात झाली होती. वेगळ्या पद्धतीची, धाटणीची फोल्क गाणी तो करायला लागला होता. राम लक्ष्मण हे नाव दादा कोंडके यांनी त्यांना दिलं होतं. काही वर्षांनी सुरेंद्र हेंद्रे वारला. मग विजय पाटील हा राम लक्ष्मणच्या नावाने शेवटपर्यंत काम करत राहिला. मराठी गाण्यात त्याने नाविन्य आणलं होतं. वेगळा ठसका असलेली आणि दादा कोंडके यांच्या सिनेमांना शोभतील अशी गाणी त्याने केली. त्यानंतर त्याला हिंदीत संधी मिळाली. राजश्री प्रॉडक्शनमुळे तो नावारुपाला आला. माधुरी दीक्षितच्या चित्रपटापासून तो वाऱ्यासारखा सुसाट वाहत गेला. हिंदीमध्ये स्थिरावणं हे मराठी लोकांसाठी फार कठीण असतं. पण या माणसाने मराठी करून हिंदीत तो जो गेला तिथे एका मुक्कामी हाय पिचवर येऊन तो मस्त उभा राहिला होता.  त्याने खूप छान काम केलं होतं. मराठी माणसाने हिंदीत जाऊन आपलं नाव कमावणं हे त्याने करुन दाखवलं होतं. मग प्रकृती खराब होत गेल्याने कामापासून दुरावला.”


 
राम लक्ष्मण (विजय पाटील) यांच्यासोबतची अशोक पत्की यांची ओळख गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे. सुरुवातीच्या काळात दोघं एकत्र प्रवासही करायचे. पत्की म्हणतात की, “50, 60 वर्षांपासून मी त्याला ओळखतोय. कोणत्या कार्यक्रमासाठी जायचं असताना आम्ही दोघांनी एकत्र लोकलने प्रवासही केला आहे. एखादा कार्यक्रम, तालीम यासाठी आम्ही एकत्र असायचो. त्याच्यासोबत खूप जवळीक होती. त्यामुळे अचानक वृत्त आल्यावर खूप वाईट वाटलं. आता तो नागपुरला राहत होता पण सुरुवातीला तो शिवाजी पार्कला रहायचा.”


राम लक्ष्मण (विजय पाटील) यांच्यासोबतच्या काही भेटींविषयी अशोक पत्की सांगतात की, “रेकॉर्डिंगच्या वेळी आम्ही भेटायचो. स्टुडिओत त्यांचं रेकॉर्डिंग असलं किंवा माझं असलं तेव्हा स्टुडिओत आमची भेट व्हायची. आमची संगीतकार म्हणून भेट होत राहिली. मात्र दोन वर्षांपूर्वी जेव्हा त्याला लता मंगेशकर पुरस्कार मिळाला तेव्हाही भेट झाली होती. त्याला काही कळत नव्हतं. विचित्र आजाराने त्याला ग्रासलं होतं. सध्याची त्याची हालत खराब होती. बोललेलं कळत नव्हतं, काही आठवतही नव्हतं.”

Recommended

Loading...
Share