Bicycle Day Exclusive : अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने मुंबईत आल्यावर अशी घेतली होती पहिली सायकल तर डबिंग स्टुडिओत घडला होता गमतीशीर किस्सा...

By  
on  

लहानपणी सायकल हे दुचाकी वाहन आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनलेली असते. मोठं झाल्यानंतर कालांतराने अनेकांना सायकलचा विसर पडू लागतो. मात्र सध्याच्या काळात काहींसाठी सायकल हा आजही महत्त्वाचा घटक आहे. असंख्य फायदे असणाऱ्या या सायकलीचं मनोरंजन विश्वातील काही कलाकारांच्या आयुष्यात महत्त्वाचं स्थान आहे. त्यापैकीच एक आहे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. 
जागतिक सायकल दिनाच्या निमित्ताने पिपींगमून मराठीने सोनाली कुलकर्णीशी संवाद साधला आहे. सोनालीच्या आयुष्यातील सायकलची सोबत आणि सायकलसोबतचे काही किस्से तिने या मुलाखतीत शेयर केले आहे.

लहानपणापासून सायकलची आवड... 
"मी शाळेत असल्यापासून सायकल चालवते. मी पुण्याची असल्याने काही गोष्टी आपोआप आपल्या लाईफस्टाईलमध्ये येतात, त्यात सायकल, टू व्हिलर असतेच. सायकल हा पुणेकरांच्या जगण्याचाच भाग आहे . मी चौथी, पाचवीत असल्यापासून शाळेत सायकलने जाते. माझी एक आयकॉनीक सायकल होती. जी माझा मोठा भाऊ संदीपने वापरली मग संदेशने वापरली मग माझ्याकडे आली. ती सायकल खूप वर्षे आमच्याकडे होती. मी काम करायला लागल्यानंतर जेव्हा मुंबईत आले तेव्हा सायकल घेणं राहुन गेलं. मग जीममध्ये तेव्हा एक्सरसाईजचे बाईक्स चालवू लागले. वन व्हील सायकलींगची मी रनरअप होते."

मुंबईत आल्यावर अशी घेतली सायकल...
"एका गॅरेजमध्ये एक सायकल मला रस्त्याच्या कडेला दिसली होती. मी तिथे जाऊन  त्या सायकलविषयी विचारपुस केली. त्यांनी आधी काय दुरुस्त करायचं विचारले. तेव्हा मी तिथे गाडी घेऊन गेले होते. मी त्यांना सांगीतलं की कार व्यवस्थित आहे पण तुमच्याकडे जी सायकल आहे ती विकणार का ? हे ऐकून त्याला धक्का बसला कारण ती सायकल फारच साधी होती. ती सायकल त्या माणसाने मला विकली आणि तेव्हा ती सायकल माझ्याकडे आली. मग मी मुंबईत सायकला चालवायला लागले."

व्हॅलेंटाईन डेला पतिकडे मागीतलं होतं हे गिफ्ट...
"मी आणि माझा नवरा जेव्हा डेटिंग करत होते तेव्हा आमच्या दोघांच्या पहिल्या व्हॅलेंटाईनला मी त्याच्याकडे सायकलची मागणी केली होती. त्याला आधी जरा धक्का बसला की एखादी मुलगी काहीतरी वेगळं मागेल. पण मी त्याच्याकडे सायकल मागीतली होती. मग त्याने माझ्यासाठी सायकल घेतली. आता माझ्याकडे अजून एक सायकल आहे ती गियर असलेली सायकल आहे, जी मी माझ्या वाढदिवसासाठी घेतली होती. आता तर मी ट्रायथलॉनही करते." 

सायकल आणि डबिंग स्टुडिओचा गमतीशीर किस्सा...
"सकाळी अनेक ठिकाणी मी सायकलने जाते. जवळच्या काही मंडळींकडे मी सायकलने गेलेलीय. पण एकदा पंचायत झाली. मी डबिंगसाठी गेले होते. पहिल्या दिवशी मी गेले तेव्हा मी येणार ही त्यांना कल्पना नव्हती म्हणून दुसऱ्या दिवशी ते सगळे स्वागतासाठी तयार होते. छोटासा फुलांचा बुके, पार्किंग वैगेरे दिली होती आणि सगळे वाट बघत थांबले होते. त्या दिवशी माझी गाडी सर्विसिंगला दिली होती तेव्हा मग मी सायकलने गेले होते. म्हणजे तेव्हा त्यांचा एवढा भ्रमनिरास झाला होता कारण त्यांनी एका मोठ्या गाडीसाठी पार्किंगही ठेवलं होतं." 

मुंबईत अनेकदा सायकलने गाठलं लांबचं अंतर..
"सकाळी सायकल चालवताना फिटनेस एन्थूही भेटतात. ते काही वेळ माझ्यासोबत लास्ट पॉईंटपर्यंत गप्पा मारत असतात.  मुंबईत मी अनेकदा सायकलने 30 ते 35 किलोमीटर असा प्रवास केला आहे. माझ्या आयुष्यात स्पर्धात्मक सायकलींग कौस्तुभ राडकरने आणलय.  तो माझा ट्रेनर आहे."

सायकलचे आरोग्यासाठी फायदे...
"मला अशा काही स्त्रिया भेटतात ज्यांना गुडघ्याचे आजार आहेत. मला अशाही खूप जणी भेटतात ज्यांना वजनाचा त्रास आहे.. अशा सगळ्यांनाच मी अपील करेल की सायकलने गुडघ्यांचाही व्यायाम होतो. जर चालता येत नसेल तर दुसरा मार्ग म्हणून सायकल चालवू शकतो, तक्रारीची बाजू राहत नाही.  सायकल हा एक खूप चांगला व्यायाम आहे. सकाळी सायकलींग करताना बरं वाटतं. आपणच आपली कंपनी असतो, फक्त सायकलमध्ये 2 रुपयांची हवा भरावी लागते . सायकल नवीनच घ्यायला पाहिजे किंवा महागडी घ्यायला पाहिजे असही काही नाहीय. साध्या सायकलनेही व्यायाम तोच होतो. त्यामुळे या पर्यायाचा सगळ्यांनीच विचार करायला पाहिजे."
  

Recommended

Loading...
Share