PeepingMoon Exclusive: 'दुर्वा'च्या सेटवर विनय काकांसोबत पहिलाच सीन देताना मी अक्षरश: कापत होते- ऋता दुर्गुळे

By  
on  

उत्कृष्ट कथानक, दमदार कलाकारांची फौज आणि मनाचं ठाव घेणारं शिर्षक गीत. आजही त्या मालिका  प्रेक्षकांच्या हदयावर अधिराज्य गाजवतात. पुन्हा पुन्हा यूट्यूबवर त्या पाहाव्याशा वाटतात. जुनं ते सोनं म्हणतात ते हेच. अशीच राजकारणावर बेतलेली एक लोकप्रिय मालिका म्हणजेच दुर्वा.

या मालिकेत नायिका साकारणारी अभिनेत्री ऋता दुर्गुळे हिची तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ आहे. नाटक व मालिकांमधून ती प्रेक्षकांवर छाप पाडतेच पण ाआता सिनेमांमधूनसुध्दा रसिकांची मनं जिंकायला ऋता सज्ज आहे. दुर्वा ही ऋताच्या करिअरमधली पहिली-वहिली मालिका. या मालिकेमुळे ती घराघरांत पोहचली. विनय आपटे, प्रताप पंडीत, अश्विनी एकबोटे, उदय टिकेकर यांसारख्या दिग्गज कलाकारांची फळी या मालिकेत होती. राजकारण, कौटुंबिक कलह आणि सत्तेचा खेळ यावर आधारित या मालिकेने मनं जिंकली.

म्हणूनच पिपींगमून मराठीने टेलिव्हिजन जगतातल्या ‘जुनं ते सोनं’ या नव्या को-या सदरात या मालिकेच्या आठवणी पुन्हा ताज्या करण्याचं ठरवलंय. मालिकेतील सर्वांची लाडकी दुर्वा म्हणजेच अभिनेत्री ऋता दुर्गुळे सोबत केलेली ही दिलखुलास बातचित. 

 

तुझ्या करिअरमधील पहिलीच मालिका दुर्वाबद्दल काय सांगशील? 

-  करिअरमध्ये तुम्हाला योग्य वेळी योग्य ती संधी मिळणं गरजेचं असतं आणि दुर्वामुळे ती मला मिळाली.  माझी पहिलीच मालिका आणि त्यात विनय आपटे, प्रताप पंडीत, अश्विनी एकबोटे, उदय टिकेकर यांसारख्या दिग्गज यांसारख्या दिग्गजांसोबत काम करायला मिळालं यापेक्षा चांगली सुवर्णसंधी असूच शकत नाही. ह्या मालिकेची संपूर्ण टीमच एकदम परिपूर्ण होती. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनावर या मालिकेने अधिराज्य गाजवलं.  मी आत्ता अनेक व्यक्तिरेखा साकारते. अनेक माध्यमांतून काम करते. पण दुर्वा मालिका माझ्यासाठी खुप खास आहे. 

 

 

ज्येष्ठ अभिनेते  विनय आपटे यांच्यासोबतचा तुझा अनुभव कसा होता?

- मला आजही आठवतोय तो दिवस. दुर्वाच्या सेटवरचा माझा त्यांच्यासोबतचा पहिलाच सीन होता. मी अक्षरश: कापत होते. मला वाक्यच बोलता येत नव्हती. मला वाटतं होतं की आता काही माझं खरं नाही. कारण ते इतके मोठे ज्येष्ठ अभिनेते आणि त्यांच्यासमोर माझ्यासारखी नवखी कलाकार हे आठवून मी गार पडत होते. पण विनय काकांनी माझी सर्व भीतीच घालवून टाकली. सीनआधी ते स्वत: माझ्यासोबत बसून वाचन करायचे. मला सारखे सांगायचे घशातून बोलून नको, पोटातून बोल. आतला आवाज यायला हवा. खाली बसून माझ्याकडून योग्य ते एक्सरसाईज सीनआधी ते करुन घ्यायचे. भरपूर शिकायला मिळालं त्यांच्याकडून. अजूनही बरंच काम त्यांच्यासोबत पुढेसुध्दा मला करायचं होतं, पण ते आपल्या सर्वांना सोडून गेले, परंतु जितकं काम विनय काकांसोबत मला करायला मिळालं ते मी माझं मोठं भाग्य समजते. 

 

 

मालिकेमुळे तुला मिळालेलं स्टारडम आणि चाहत्यांच्या प्रतिक्रीया याबद्दल काय सांगशील?

- कदाचित तुम्हाला हे खरं वाटणार नाही. पण आजही मला सातारा, सांगली, कोल्हापूर यांसारख्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत दुर्वा म्हणूनच ओळखतात. मी एकदा एका कार्यक्रमाला गेले होते. तेव्हा तिथे एक गृहस्थ भेटले तेव्हा सोबत त्यांची तरुण लेक होती. ते मला म्हणाले, तुमच्यामुळेच आम्हीसुध्दा आमच्या मुलीला राजकारणात जाण्यासाठी प्रोत्साहन दिलंय. ती आता गावच्या इलेक्शनला उभी आहे. हे ऐकून खरंच खुप भारावून गेले आणि जबाबदारीसुध्दा वाढली. असेच अनेक जण भेटले कोणी बहिणीला तर कोणी बायकोला राजकारणात सक्रीय करण्यात पुढाकार घेत होते.त्यावेळेस मालिकेत दुर्वाचा राजकीय प्रवास यशस्वीरित्या सुरु होता. त्यामुळे अनेक तरुणींंना राजकारणात सहभागी होण्यासाठी मी प्रेरणा वाटायचे.

 

 

दुर्वा मालिकेमुळे तुला काय शिकवण मिळाली? 

- लोकांपर्यंत पोहचायचं तर टेलिव्हिजन हे सर्वात मोठं माध्यम आहे . माझ्या करिअरच्या सुरुवातीलाच मला इतकी मोठी मालिका मिळाली, तीसुध्दा अभिनयाची कुठलीच पार्श्वभूमी नसताना. ऑनस्क्रीन तुम्ही कसे असता आणि ऑफस्क्रीन तुम्ही माणूस म्हणून कसे आहात,हे या मालिकेतील सर्वच दिग्गज कलाकारांकडून शिकायला मिळालं. ह्या सर्वांबरोबर काम करताना मला खुप शिकायला मिळालं. एक ्प्रकारे अभिनयाचं एक शिबिरचं माझ्याभोवती भरलेलं आहे असं वाटायचं.  ह्या दिग्गजांचं नुसतं निरिक्षण जरी केलं तरी ब-याच गोष्टी शिकता यायच्या. दुर्वानंतर माझ्या करिअरचा आलेख नेहमीच चढता राहिलाय. त्यामुळे दुर्वा ही नेहमीच जवळची राहील. 

 

Recommended

Loading...
Share