योगा केल्यामुळे आपलं शरीर नेहमी निरोगी राहतं. मात्र उत्तम आरोग्यासह योगाचे लवचिक शरीर, शांत आणि प्रसन्न मन ठेवण्यासह विविध फायदे आहेत. विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांच्या आयुष्यात योगाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. संगीत क्षेत्रातही योगामुळे अनेक फायदे होतात. जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने गायिका कीर्ति किल्लेदारने योगाचा तिच्या संगीत करियरमध्ये होणारा परिणाम सांगीतला आहे. तिच्या आयुष्यात संगीताला योगाची जोड कशी आहे याविषयी पिपींगमून मराठीला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत तिने सांगीतलय.
कीर्तिच्या आयुष्यात काही वर्षांपूर्वी योगा आला, त्यानंतर तिचं आयुष्य कसं बदललं याविषयी ती म्हणते की, “4 वर्षांपूर्वी मी योगा करायला सुरुवात केली, अगदी बेसीक योगा शिकणे किंवा वजय कमी करायचय वैगेरे अशी कारणं होती. जवळच्या एका योगा सेंटरमध्ये जाऊन मी शिकायला सुरुवात केली. माझ्यासाठी सुरुवातीला ते खूप कठिण होतं. माझी अशी समजुत होती की मी लवचीक नाही तर कशी सुरुवात करेन. पण पहिलाच धडा असा शिकले की योगा केल्याने तुम्ही फ्लेक्झिबल म्हणजेच लवचीक व्हाल. योगा शिकताना हा पहिलाच मंत्र माझ्यासाठी महत्त्वाचा ठरला. हा प्रवास हळूहळू खूप मोठा होत गेला. हळूहळू योगामुळे इतका परिणाम जाणवू लागला होता की, तो परिणाम फक्त शरीरावर नव्हता तर विचार करण्याची तुमची पद्धत बदलते, तुमच्यात खूप संयम येतो, अवतीभवती ज्या गोष्टी घडतायत त्यांना एका वेगळ्या दृष्टीकोनाने तुम्ही पाहू लागता. हे सगळं मला योगामुळे भावलं. आता योगा हा माझ्या आयुष्यात महत्त्वाचा भाग झालाय. लॉकडाऊनच्या काळात मी घरात बसून त्या प्रवासात आणखी खोलवर जाऊ लागले. एक माणूस म्हणून मला योगाची खूप मदत झालीय.”
योगाच्या या प्रवासात पुढे जाऊन आणखी शिकून योगाविषयीची माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्याची कीर्तिची इच्छा आहे. ती सांगते की, “जसजसं त्याच्या खोलात जाता तसं तुम्ही कितीही केलं तरी कमी आहे असं वाटू लागतं. त्यासाठी तुम्हाला दररोज सराव करावा लागतो. तुमच्या शरीरासोबतचा हा प्रवास असतो. या प्रवासात विविध जागा येत जातात. यात आणखीन शिकून घेण्याचा विचार होता तशी इच्छाही होती. पण लॉकडाऊनमुळे ते करता आले नाही. पण पुन्हा योगामुळे अजून एक पाऊल पुढे घेऊन, शिकून सर्टिफिकेट घेऊन मी जे अनुभव केलय ते लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे.”
कीर्तिने मराठी मनोरंजन विश्वात मालिका, चित्रपट, विविध अल्बमच्या माध्यमातून उत्तमोत्तम गाणी गायली आहेत. यात योगाचा प्रवास सुरु झाल्याने गायन क्षेत्रातही तिला याचा चांगलाच फायदा होतो. ती म्हणते की, “योगाचा माझ्या करियरमध्ये खूप परिणाम झाला. गाण्यामध्ये श्वसनक्रिया खूप महत्त्वाची असते. संगीत म्हणजे श्वासाचा खेळ आहे. यात प्राणायममुळे संगीत क्षेत्रात खूप फायदा झाला. लक्ष केंद्रित करण्याच्या दृष्टीकोनातूनही योगा मला खूप फायद्याचे ठरले. कारण तुम्हाला शांत ठेवण्यात योग, प्राणायमचे खूप फायदे असतात.”
कीर्तिच्या घरात ती लहान असल्यापासूनच कलेचं वातावरण होतं. किर्तीचे आई-बाबा हे कायम संगीतप्रेमी आहेत. त्यामुळे शाळा, कॉलेजात असताना विविध स्पर्धेतून किर्ती भाग घेत होती. गायन क्षेत्रात काम करत असताना आता लवकरच म्युझिक कम्पोझर म्हणून नावारुपाला यायची किर्तीची इच्छा आहे. याविषयी ती सांगते की, “मला जसं संगीत कळत गेलं, तेव्हा मला जाणवलं की हे मला आयुष्यभर करायला खूप आवडेल. म्युझिक कम्पोझर म्हणून आगामी काळात खूप काम करायचय. गेल्या वर्षी मी हिंदी गझल कम्पोज केली होती. आता लवकरच एका मराठी चित्रपटात मी त्यातील गाणी कप्मोझ करतेय. ती गाणी येतील तेव्हा लोकं माझ्यातील संगीतकाराला देखील तितकच प्रेम देतील जसं माझ्या गायकीवर केलय याचा मला विश्वास आहे.”
लता मंगेशकर, अलका यागनीकपासून विविध गायक, गायिका, संगीतकार कीर्तिला प्रेरणा देतात. मात्र संगीत क्षेत्रातील नवोदित कलाकारांसाठी किर्ती रिएलिटी शोविषयीचा एक महत्त्वाचा मुद्दा इथे मांडतेय. “रिेएलिटी शोच्या माध्यमातून तुम्ही तुमचं टॅलेंट लोकांसमोर आणू शकतात. पण तेच सर्वस्व मानून चालणार नाही. नवोदीत कलाकारांनी त्याला सुरुवात म्हणून पाहणं गरजेचं आहे. अशा प्रकारचे कार्यक्रम कलाकारांना मनोरंजनाच्या दृष्टीकोनातून समोर आणतात. अनेक जण त्यातून नैराश्यमध्ये जातात. तर तो प्रवास तिथे संपत नसून त्याला सुरुवात म्हणूनच पाहावं. या क्षेत्रात एक्सप्लोअर करणं हे फक्त रिएलिटी शो पुरतं नसून संगीताचं विश्व खूप मोठं आहे.”