उत्कृष्ट कथानक, दमदार कलाकारांची फौज आणि मनाचं ठाव घेणारं शिर्षक गीत. आजही त्या मालिका प्रेक्षकांच्या हदयावर अधिराज्य गाजवतात. पुन्हा पुन्हा यूट्यूबवर त्या पाहाव्याशा वाटतात. 'जुनं ते सोनं' म्हणतात ते हेच.अशीच एक वेगल्या धाटणीची कथा असलेल्या पिंजरा मालिकेने काही वर्षांपूर्वी रसिक प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं.
तमाशा कलाकारांच्या घरातील नृत्यांगना तरुणी आनंदी ही वीर नावाच्या प्रतिष्ठित घराण्याचा मुलाच्या प्रेमात पडते आणि त्याचं लग्नानंतरचं नातं कसं खुलतं या कथानकावर ही मालिका बेतली होती. अनेक दिग्गज कलाकारांनी या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका सकारल्या आहेत.भूषण प्रधान, संस्कृती बालगुडे, शुभांगी लाटकर, सुमुखी पेंडसे, गिरीश ओक, विजय पटवर्धन, भार्गवी चिरमुले, अतुल तोडणकर, सुनील तावडे या कलाकारांच्या भूमिकांनी ही मालिका सजली.
'पिंजरा' मालिकेनंतर तब्बल आठ वर्षांनी प्रसिध्द अभिनेता भूषण प्रधान 'जय भवानी, जय शिवाजी' मालिकेद्वारे टेलिव्हिजनवर कमबॅक करतोय. म्हणूनच पिपींगमून मराठीने टेलिव्हिजन जगतातल्या ‘जुनं ते सोनं’ या 'पिंजरा' या मालिकेच्या आठवणी पुन्हा' ताज्या करण्याचं ठरवलंय. मालिकेतील सर्वांचा लाडका हॅण्डसम वीर म्हणजेच अभिनेता भूषण प्रधानसोबत केलेली ही दिलखुलास बातचित
‘पिंजरा’ मालिकेने काय दिलं आणि तुला ती जास्त जवळची का आहे?
या मालिकेत मी वीर ही व्यक्तिरेखा साकारलीय. या मालिकेमुळे प्रेक्षकांनी माझ्यावर भरभरुन प्रेम केलं आणि मी घराघरांत पोहचलो. ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खुपच भावली. वीर सतत सकारात्मक राहणारा असा नायक होता आणि प्रेक्षकांना तो हवाहवासा वाटायचा. ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली. मला आठवतंय, एकदा लोकग्रहास्तव कथानकातसुध्दा फेरफार करावा लागला होता. वीरच्या लग्नासंदर्चंभातलं ते कथानक होतं. या मालिकेमुळेच मला सिनेमांच्या ऑफर्स यायला लागल्या आणि सिनेमांचा प्रवास सुखकर झाला. म्हणूनच ही मालिका माझ्या खुप जवळची आहे. तसंच या मालिकेमुळे ऑनस्क्रीनचं नाही तर पडद्यामागेसुध्दा आम्हा सर्वच कलाकारांचं एक छान कुटुंब तयार झालं. अजूनही आम्हा सर्वांचा एक व्हॉट्सएपग्रुप आहे. मालिका संपून आठ-नऊ वर्षे लोटली तरी आम्ही सतत या ग्रुपवर सक्रीय असतो. एकमेकांशी छान संवाद साधतो. एकमेकांच्या आयुष्यात काय घडतंय याची आम्हाला माहिती असते.
मालिकेमुळे चाहत्यांकडून कसं प्रेम मिळालं, एखादा आठवणीतला किस्सा सांगू शकशील का?
- पिंजरा मालिका रसिक प्रेक्षकांची प्रचंड आवडती होती. मालिका संपल्यानंतर आम्ही जेव्हा बाहेरच्या जगात फिरु लागलो तेव्हा या मालिकेची खरी क्रेझ कळली. कधी गावोगावी सिनेमाच्या शूटींगनिमित्ताने जावं लागायचं तेव्हा लोकं अक्षरश: वीर आला म्हणून वेडे व्हायचे. पत्र, मेसेजेस, कॉल्स , मेल्स यामधून चाहते सतत प्रशंसा करायचे. महत्तत्वाचं म्हणजे पिंजराचा सिनिअर सिटीजन्सचा खुप मोठा चाहता वर्ग होता. असाच एक किस्सा मला आवर्जून सांगावासा वाटतो, की मला एकदा एक आज्जी भेटल्या होत्या आणि त्या म्हणाल्या माझं वय 70 आहे, पण अजूनही तू जेव्हा आनंदीकडे प्रेमाने पाहतोस तेव्हा माझ्या हदयाची धडधड वाढते. ते एकून मी धन्य झालो. त्या सतत पत्र लिहून मालिकेबद्दल आम्हा कलाकारांचं कौतुक करायच्या. नंतर नंतर तर त्यांच्या पत्राची इतकी सवय झाली की पत्र नाही आलं की चुकचुकल्या सारखं वाटायचं. जेव्हा त्यांची पत्रं थांबली तेव्हा कळलं की त्या कॅन्सरने आजारी आहेत. 'पिंजरा'चे फॅन्स अजूनही संपर्कात आहेत, युट्यूबवर ते मालिकेचे भाग पाहतात आणि आवर्जुन कळवतात.त्यामुळेच अशा सर्वोत्तम कलाकृतीचा भाग झाल्याचा आनंद वाटतो.
‘पिंजरा’ तील तुझी आणि संस्कृतीची केमिस्ट्री प्रेक्षकांना तुफान आवडली याबद्दल काय सांगशील ?
- मी आणि संस्कृतीची केमिस्ट्री खुप जबरदस्त आहे असं सर्वजण म्हणायचे. पण आम्हालाच कळायचं नाही की, आम्ही नेमकं असं काय वेगळं करतोय जे प्रेक्षकांना खुप भावतंय. आम्ही सीनमध्ये काहीच ठरवून करायचो नाही. जे काही आपसूक आणि मनापासून करायचो. अभिनयात एकमेकांना 100 टक्के साथ द्यायचो. मला वटतं हेच आमच्या जोडीचं यश होतं. मालिका संपल्यानंतरसुध्दा आम्ही दोघांनी जवळपास चार सिनेमे एकत्र केले आहेत. अनेक कामं आमच्याकडे एकत्रच येतात. ती मैत्री, आमची जोडी, भांडण असं सर्व सतत टिकून आहे. त्यामुळे काम करताना एक प्रकारचा कम्फर्ट आमच्यात आहे. 'तुझं माझं जमेना तुझ्यावाचून करमेना', असं असतं आमच्यात.
‘पिंजरा’नंतर तब्बल आठ वर्षांनी तू आता जय भवानी जय शिवाजी मालिकेद्वारे टेलिव्हिजनवर कमबॅक करतोय या प्रवासाबद्दल सांग?
- होय जसं मी आधी म्हणालो, त्याप्रमाणेच मी पिंजरा मालिकेत काम केल्यानंतर सिनेमांमध्येच रमलो. पण आता इतक्या वर्षानंतर पुन्हा टेलिव्हिजनवर कमबॅक करतोय. तेसुध्दा छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिरेखेतून. या दोन्ही मालिकांमधला एक योगायोग मला इथे आवर्जून सांगावासा वाटतो, तो म्हणजे. जिथे पिंजरा मालिका संपली जिथून आम्ही घराला कुलूप लावून रसिक प्रेक्षकांना बाय बाय करतो त्या आमच्या वाड्याचा सेटवरच्याच ठिकाणी; आत्ता तब्बल आठ वर्षांनतर मी टेलिव्हिजनवर कमबॅक करतोय त्या ' जय भवानी जय शिवाजी' या मालिकेतला माझा एन्ट्रीचा महत्त्वपूर्ण शॉट घेण्यात आलाय, त्यावेळेस हा विलक्षण योगायोगच घडल्याचे समजल्यावर मी थक्क झालो. लगेचच पिंजरा मालिकेचा दोन –अडीच वर्षांचा प्रवास, आठवणी असं सर्वकाही डोळ्यासमोर तरळलं आणि या योगायोगामुळे खुप भावूकसुध्दा झालो. नव्या प्रवासासाठी एकप्रकारच्या शुभेच्छाच मला मिळाल्या.