‘सिटी ऑफ ड्रिम्स सिझन 2’ या वेब सिरीजच्या निमित्ताने लोकप्रिय अभिनेते सचिन पिळगावकर पुन्हा एकदा गुरव ही राजकारण्याची व्यक्तिरेखा साकारतायत. या भूमिकेतील त्यांचा खलनायकी अंदाज लक्षवेधी ठरतोय. याच सिरीजच्या निमित्ताने पिपींगमून मराठीने सचिन यांच्यासोबत संवाद साधला आहे. यावेळी ओटीटी प्लॅटफॉर्मवर मराठी कलाकारांना मिळणाऱ्या भूमिकांविषयीचा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी यावेळी मांडलाय.
ओटीटी प्लॅटफॉर्म काम करण्याची इच्छा असतानाही हव्या तश्या भूमिका मिळत नसल्याची खंत सचिन यांनी यावेळी व्यक्त केली आहे. अनेक भूमिकांसाठी नकारही द्यावा लागत असल्याचं ते सांगतात. ते म्हणतात की, “मला काही ऑफर्स आल्या पण मी त्या नाही केल्या, मला टाईपकास्ट होऊन काम करायचं नाहीय. खलनायक साकारायला मला प्रॉब्लेम नाही पण ती घिसीपीटी कॅरेक्टर्स मला करायची नाहीत.”
मराठीपेक्षाही हिंदीत मोठ्या प्रमाणात काम केलेलं असतानाही सचिन यांना मराठी भूमिकांसाठी मोठ्या प्रमाणात विचारणा होत असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
ते म्हणतात की, “जर लोकांचं म्हणणं असेल की मराठी अभिनेता आहे, तर माझ्याबद्दलचा तसा विचार करणं गैर आहे. कारण मी हिंदीमध्ये मराठीपेक्षा जास्त काम केलय. असं मला ठामपणे वाटतं की ही टाईपकास्टिंग झाली. याच्यात जर तुम्ही हुशारी दाखवत असाल तर हे गैर आहे. मराठी सिनेमांमध्येसुद्धा मी जर मुस्लिम भूमिका साकारत असेल तर मग हिंदीत काय ? मराठी चित्रपटसृष्टीपासून मी सुरुवात केली असली आणि मराठी माझी मातृभाषा असली ज्याचा मला अभिमान आहे तरी भारतातील इतर ठिकाणी लोकं मला फक्त सचिन या नावाने ओळखतात. महाराष्ट्र हा भारताचा एक भाग आहे.”
आगामी काळात एका खास भूमिकेतून सचिन पिळगावकर झळकणार असल्याचं सांगतात, मात्र त्या भूमिकेवर अद्याप शिक्कामोर्तब न झाल्यानं त्याविषयी त्यांनी खुलासा केलेला नाही. असं असलं तरी ती भूमिकाही मराठी असल्याचं त्यांनी सांगितलय. “मला टिपीकल खलनायक साकारण्याच्या भूमिकांसाठीही विचारलं जातं, एक चांगली भूमिका माझ्याकडे आलीय, तो रोल मला खूप इंटरेस्टिंग वाटला, पण तो रोलही एका मराठी माणसाचा आहे. तो रोल चांगला असल्यामुळे मी अवश्य करेन. अशावेळी मी मराठी भूमिका म्हणून ती भूमिका नाही करणार असं नाही. भूमिकाही चांगली असणं गरजेचं आहे.”
विशेषकरुन ओटीटी प्लॅटफॉर्मवर हिंदीत मोठ्या प्रमाणात मराठी भूमिकांसाठीच मराठी कलाकारांचा विचार केला जात असल्याचं सचिन पिळगावकर म्हणतात. “कधी कधी असा प्रश्न पडतो की महाराष्ट्रियन कॅरेक्टर करायचं असतं तेव्हाच मराठी लोकांचा विचार का केला जातो ? हे फक्त मी माझ्या बाबातीत बोलत नाहीय. एखाद्या वेगळ्या भूमिकांसाठी मराठी कलाकारांचा विचार का होत नाही. कलाकार हे कलाकार आहेत, मराठीतही असं बघितलं जात नाही. एका फ्रेममध्ये सगळे येतात तर ते सगळे समान असतात. महाराष्ट्रिन व्यक्तिरेखांसाठी मराठी कलाकारच असायला पाहिजे, असा विचार ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी काम करणारी लोकं किंवा निर्माते यांनी करु नये.”
ही खंत व्यक्त करत ओटीटी प्लॅटफॉर्मवर आगामी काळात आणखी काम करण्याची इच्छा असल्याचं सचिन पिळगावकर यांनी सांगितलय.