By  
on  

PeepingMoon Exclusive : "ओटीटीवर दादा कोंडकेंनी धुमाकुळ घातला असता", आगामी ओटीटी प्लॅटफॉर्मविषयी स्वप्नील जोशीने सांगितली ही गोष्ट

हिंदीसह मराठीतही मालिका, चित्रपट, जाहिराती आणि वेबसिरीजमधून काम करणारा लोकप्रिय अभिनेता स्वप्नील जोशी आता स्वत:चं नॅशनल ओटीटी प्लॅटफॉर्म घेऊन येतोय. त्याच्या टामोरा डीजीवर्ल्ड या कंपनीच्या माध्यमातून प्रसिद्ध व्यावसायिक नरेंद्र फिरोदिया यांच्यासोबत एकत्रितपणे  हा ओटीटी प्लॅटफॉर्म घेऊन येत आहेत.  हिंदी, मराठी आणि इंग्रजीसह विविध भाषांमधील कॉन्टेंट या प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहेत.
 
याविषयी पिपींगमून मराठीने स्वप्नील जोशीसोबत संवाद साधला. यावेळी त्याने त्याच्या आगामी ओटीटी प्लॅटफॉर्मविषयी बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत. तो म्हणतो की, "ओटीटीवर तुमच्या कथानकाचा नायक आणि नायिका जी आहे तो तुमचा हिरो किंवा हिरॉईन झालाय. कथानकाशी प्रामाणिक राहुन कॉन्टेन्ट बनवण्याचा प्रयत्न या ओटीटी प्लॅटफॉर्मवर केला जाईल." स्वप्नील पुढे म्हणतो की, "इतकी वर्षे कॅमेऱ्यासमोर असणारा स्वप्नील जोशी आता कॅमेऱ्याच्यामागे जाणार आहे, म्हणजे त्या प्लॅटफॉर्मचा गोतावळा सांभाळणं हे खूप जबाबदारीचं, मेहनतीचं आणि खूप आनंद देणारं काम आहे. यानिमित्ताने अनेक मान्यवरांना भेटण्याची आणि त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळतेय."

मात्र कोणत्या कलाकारासोबत काम करण्याची इच्छा असल्याचं विचारल्यावर स्वप्नील म्हणतो की, "आता ते शक्य नाही पण मला नेहमी असं वाटतं की दादा कोंडके आज असते तर त्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर धुमाकुळ घातला असता. ते जे कॉन्टेंट करायचे त्यात ड्रामा, मिश्कीलपणा, खट्याळपणा होता, त्यातही ते सामाजिक मुद्दा मांडायचे. मला नेहमी राहुन राहुन वाटतं की आज दादा असते तर रसिकांसाठी काय पर्वणी झाली असती. त्यांच्या कॉन्टेंटमध्ये वजन असायचं."
त्यामुळे स्वप्नीलच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर दादा कोंडके यांच्या चित्रपटाचा कॉन्टेंट दिसण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

इतर भाषांसह मराठी कॉन्टेंटचाही विचार स्वप्नीलच्या या ओटीटीवर केला जाईल. स्वप्नील सांगतो की, "जास्तीत जास्त मराठी कॉन्टेंट येऊ शकला आणि मी ते लोकांना दाखवू शकलो तर त्याचा आनंद असेल. मराठी कॉन्टेंट महाराष्ट्राबाहेर कसा घेऊन जाता येईल याचाही प्रयत्न केला जाईल. या अर्थाने महाराष्ट्राबद्दल, देशाबद्दल नव्याने गोष्टी कळतायत, शिकायला मिळतायत,  जाणून घ्यायला मिळत आहेत. मी या इंडस्ट्रीत इतकी वर्षे जे शिकलो त्याचा वेगळ्या पद्धतिने वापर करायला मिळतोय."

Recommended

PeepingMoon Exclusive