PeepingMoon Exclusive : "माझ्यातील अभिनेत्याला थोडं बाजुला बसावं लागणार", स्वप्नील जोशीच्या ओटीटी प्लॅटफॉर्ममध्ये या गोष्टींचा केला जाईल विचार

By  
on  

अभिनेता स्वप्नील जोशी हा त्याच्या करियरमध्ये कायम विविध प्रयोग करुन पाहताना दिसलाय. अभिनेता म्हणून विविध प्रयोग करुन पाहिल्यावर आता व्यावसायिक गणितं सोडवताना दिसेल. कारण आगामी काळात स्वप्नील लवकरच नॅशनल ओटीटी प्लॅटफॉर्म घेऊन येत आहे. प्रसिद्ध व्यावसायिक नरेंद्र फिरोदिया यांच्यासोबत स्वप्नीलची कंपनी टामोरा डिजीवर्ल्डसोबत एकत्रीतपणे हा ओटीटी प्लॅटफॉर्म भेटीला येणार आहे. 

स्वप्नीलच्या या नव्या इनिंगच्या निमित्ताने पिपींगमून मराठीने त्याच्याशी एक्सक्लुझिव्ह संवाद साधला. यावेळी त्याने या आगामी प्लॅटफॉर्मविषयीच्या बऱ्याच गोष्टी शेयर केल्या आहेत. स्वत:चं ओटीटी प्लॅटफॉर्म असलं तरी त्यात स्वप्नील अभिनेता म्हणून काम करेल का या प्रश्नावर स्वप्नीलकडून हे उत्तर मिळालय. स्वप्नील म्हणतो की, "या प्लॅटफॉर्मच्या बहुतांश शोमध्ये मी नसणार. कारण या चॅनेलचा सर्वेसर्वा म्हणून लीड करताना माझ्यातील अभिनेत्याला थोडं बाजुला बसावं लागणार आहे. असं होऊ शकत नाही की स्वप्नीलचा ओटीटी म्हणून सगळ्या शोमध्ये स्वप्नील असेल. असं करु नये. त्या कथानकाला जो योग्य नायक-नायिका असेल त्याच्यात स्वप्नील जर नायक म्हणून बसत असेल तर स्वप्नीललाही ऑडिशन द्यावं लागेल. जर त्यात स्वप्नील जोशी बसतोय तर मी निश्चित काम करेल."

सध्या विविध वाहिन्यांसह ओटीटीवरही मोठी स्पर्धा सुरु आहे. अनेक ओटीटी माध्यम उत्तम कॉन्टेंटसह प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. अशा स्पर्धेत हे नवं ओटीटी प्लॅटफॉर्म काय वेगळेपण सिद्ध करेल आणि कसं टिकून राहिल याविषयी स्वप्नील म्हणतो की, "जेव्हा दूरदर्शन होतं तेव्हाही मी काम करत होतो, जेव्हा पहिला सॅटेलाईट चॅनेल आला तेव्हा क्रांती सुरु झाली होती की अनेक सॅटेलाईट चॅनेल येणार. तेव्हा लोकं म्हणत होती की कसा टिकाव लागणार. मला असं वाटतय की प्रेक्षक हा महासागर आहे. प्रत्येकाला आपली घागर भरुन घेण्याची संधी हा महासागर देतो. प्रेक्षक जे आहेत ते समुद्रासारखे आहेत. त्यामुळे प्रत्येकाला दोना घागर भरण्याची संधी मिळतेच. पण आम्ही तीन घागर कशी भरू याकडे भर असेल."

याशिवाय मराठी कॉन्टेंटचाही या ओटीटीसाठी विचार केला जाईल आणि मराठीला महत्त्वाचं स्थान असल्याचं स्वप्नील सांगतो. "नॅशनल ओटीटी असल्यामुळे हिंदी, इंग्रजी, मराठीसह विविध भाषांमधील कॉन्टेन्ट असेल. पण मी असल्यामुळे थोडासा मराठीसाठी कल जास्त असेल. मराठी मेकर्स, लेखक, दिग्दर्शक, कलाकार सगळ्या ओटीटीवर धुमाकुळ घालत आहेत. मराठीसह हिंदीतही छान काम करत आहेत. चांगला मराठी कॉन्टेंट आणणं आणि त्याला देशभरात पोहोचवण्याचा प्रयत्न असेल."

या ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी जास्त वाट पाहावी लागणार नसून लवकरच याच्या लाँचविषयी घोषणा करण्यात येणार असल्याचं स्वप्नील म्हटलाय.

Recommended

Loading...
Share