सर्वत्र गणरायाचं जल्लोषात आगमन झालं . लाडक्या बाप्पाचे हे दहा दिवस भक्तीमय आनंद आणि हर्षोल्हास घेऊन सुखावून टाकतायत. बाप्पाच्या सेवेत सर्वच तल्लीन झाले आहेत. 'जय मल्हार' या मालिकेत श्री खंडेरायाची भूमिका साकारुन देवदत्त महाराष्ट्राच्या कानाकोप-यात पोहचले. आजही त्यांची ही ओळख कायम आहे. 'जय मल्हार' मालिका सुरु असताना त्या काळात या मालिकेच्या अफाट लोकप्रियतेमुळे तेव्हाच्या गणेशोत्सवात अनेकांच्या घरी ह्या मालिकेसारखेच जय मल्हार रुपातील बाप्पा विराजमान झाल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं. देवदत्त यांच्या घरीसुध्दा तेव्हा जय मल्हारच्या रुपातील बाप्पा आले होते.
यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी साधेपणाने आणि घरच्या घरी उत्साहात गणेशोत्सव साजरा करावा. तसंच मास्क आणि सॅनिटायझरचा योग्य वापर करत सुरक्षित राहण्याचं आवाहन देवदत्त यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून केले आहे.
पिपींगमूनशी एक्सक्लुझिव्ह बातचित करताना देवदत्त सांगतात, "यंदा आमच्याकडे अगदी छोटीशी सुंदर- सुबक अशी बाप्पाची शाडूची मूर्ती विराजमान झाली आहे. काही कारणास्तव यंदा आम्ही अत्यंत साधेपणाने गणेशोत्सव साजरा करतोय. गौरी विसर्जनाबरोबर आमच्या गणरायाचं विसर्जन होतं. तसंच एक महत्त्वाचं म्हणजे या वर्षीपासून आम्ही घरच्या घरीच बाप्पाचं विसर्जन पाण्याच्या कुंडीत करण्याचं योजिलं आहे. हे पर्यावरणाला पूरक ठरणार आहे. घरोघरी गणेशोत्सव साजरा करणा-या प्रत्येकाने अशाच प्रकारे पर्यावरणाचं जतन केलं पाहिजे, ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे समुद्रकिना-यावर बाप्पाच्या मूर्तींची होणारी विटंबना टळेल आणि जल प्रदूषणही होणार नाही."
देवदत्त नागे हे निसर्गरम्य अलिबाग येथे राहतात. तिथे चोहोबाजूंनी अथांग पसरणारे असे समुद्रकिनारे आहेत. पण तरीही समुद्रकिनारी बाप्पाचं विसर्जन न करता घरच्या घरीच बाप्पाचं विसर्जन करण्याचा त्यांचा निर्णय स्तुत्य म्हणावा लागेल. पर्यावरणाचं जतन करण्याचा महत्त्वपूर्ण संदेश त्यांनी यंदाच्या गणेशोत्सवात चाहत्यांना दिला आहे.