मागील वर्षी प्रदर्शित झालेला ‘विजेता’ हा मराठी चित्रपट पुन्हा एकदा यावर्षी प्रदर्शित करण्यात आलाय. कोरोनाग्रस्त परिस्थितीत लॉकडाऊनमुळे सिनेमागृह बंद करण्यात आली होती. आणि त्यामुळे मागील वर्षी प्रदर्शित झालेला विजेता हा चित्रपट पुन्हा एकदा यावर्षी प्रदर्शित झाला. यादरम्यान हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित न करता तो सिनेमागृहातच प्रदर्शित करण्याची या चित्रपटाचे प्रेझेंटर सुभाष घई यांची इच्छा होती. म्हणूनच सिनेमागृह सुरु होण्याची वाट त्यांनी बघीतली. याच चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान पिपींगमून मराठीने प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते ज्यांची शोमॅन अशी ओळक आहे त्या सुभाष घई यांच्यासोबत खास मुलाखत केली. यावेळी त्यांनी मराठी चित्रपट, हिंदी चित्रपटांचे रिमेक अशा विविध विषयांवर दिलखुलास बातचीत केलीय.
मराठी चित्रपटातील संस्कृतीचं दर्शन आणि भाषेवर सुभाष घई यांचं नितांत प्रेम आहे. म्हणूनच त्यांनी आत्तापर्यंत दोन मराठी चित्रपटांची निर्मिती केली. विजेता हा त्यांचा दुसरा मराठी चित्रपट आहे. यावेळी बोलताना त्यांनी हिंदीत होत असलेल्या रिमेक चित्रपटांविषयीही त्यांचं मत व्यक्त केलय.
ते सांगतात की "माझ्या चित्रपटांचे रिमेक मी नाही बनवू शकत. पण रोज सकाळी उठून मला नवी कल्पना, नवी कहाणी सुचते, नवा विचार येत असतो. जर दुसऱ्या दिग्दर्शकाने खलनायक बनवला तर मला बघायचय की ते तो सिनेमा कसा बनवतील.”
मात्र सुभाष घई यांच्या कोणत्या चित्रपटाचा रिमेक बनवू नये असं त्यांना विचारलं असता त्यांनी त्यांच्या गाजलेल्या ‘ताल’ या चित्रपटाचा उल्लेख केला. ते म्हटले की, “मला एक सिनेमा वाटतो तो म्हणजे ताल. 'ताल'चं संगीत ही त्यांची ताकद होती. या सिनेमाचा रिमेक यासाठी नाही झाला पाहिजे किंवा जर झाला तरी तो विशिष्ट पद्धतिने झाला पाहिजे. जेव्हा रिमेक होतो तेव्हा दिग्दर्शक आपल्या दृष्टीकोनातून त्या सिनेमाला पाहतो. ताल सिनेमाता मेलोड्रामा नाही, सेक्स नाही, वायोलन्स नाही. एक सिनेमा हिट होण्याची जी कारणं लागतात ती या सिनेमात नाहीत. मात्र तरीही हा सिनेमा आजही लोकांना लक्षात आहे आणि कायम लक्षात राहील. तर मला वाटतं की ताल हा असा सिनेमा आहे ज्याचा रिमेक नाही होऊ शकत, आणि झाला तरी तो कदाचित वेगळा असेल.”
याशिवाय सुभाष घईंनी त्यांचा आगामी हिंदी सिनेमा 36 फार्महाऊस विषयी देखील सांगितलं. शिवाय प्रत्येक वर्षी एक किंवा दोन मराठी सिनेमे घेऊन येणार असल्याचही ते यावेळी बोलले आहेत.