एक असा हरहुन्नरी कलाकार ज्यांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलय. ज्यांचे चित्रपट, नाटकं, मालिका आत्तापर्यंत प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत, असे लेखक-दिग्दर्शक केदार शिंदे यांचा आज वाढदिवस. या वाढदिवसानिमित्त त्यांनी पीपिंगमून मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या आगामी प्रोजेक्ट्सविषयी एक्सक्लुझिव्ह माहिती शेयर केली आहे.
केदार शिंदे यांचं कोणतही काम असेल त्याविषयी उत्सुकता ही असतेच. म्हणूनच त्यांनी घोषणा केलेल्या ‘मंगळागौर’ या चित्रपटाचीही तितकची उत्सुकता आहे. याविषयी पीपिंगमून मराठीला सांगताना केदार शिंदे म्हणाले की, “यंदा 1 फेब्रुवारीपासून ‘मंगळागौर’या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होईल. चित्रपटाविषय़ी आणखी काही माहिती अद्याप उलगडू शकत नाही. मात्र हा चित्रपट महिलांना केंद्रस्थानी घेऊनच तयार करण्यात येईल. प्रत्येक महिलेला जवळचा वाटेल असा हा चित्रपट असेल. माझी पत्नी, आई, मावशी, आजी यांना मी हा चित्रपट समर्पित करतोय. शिवाय प्रत्येक महिलेला हा चित्रपट मी समर्पित करेल."
याविषयी बोलताना केदार शिंदे पुढे स्पष्ट करतात की, "40 ते 60 वयोगटातील ज्या महिला आहेत, त्यांच्या भावना लक्षात घेऊन हा चित्रपट तयार करण्यात येईल. 2 वर्षे या चित्रपटावर मी काम केलय त्यामुळे आता चित्रीकरणासाठी उत्सुक आहे. ‘अगं बाई अरेच्चा’ चित्रपटानंतर मला महिला प्रेक्षकांचं भरपुर प्रेम मिळालं, महिलांनी खुप मान दिला. त्यामुळे मी पुन्हा एकदा महिलांचा दृष्टिकोन लक्षात घेऊन चित्रपट घेऊन येत आहे.”
शिवाय केदार शिंदे यांनी 2019मध्ये ‘वाजले की बारा’ आणि ‘मी पुन्हा येईन’ या नाटकांची घोषणा केली होती. त्यामुळे ‘मंगळागौर’ या चित्रपटाच्या चित्रीकरणानंतर म्हणजेच मार्च महिन्यानंतर ही नाटकं प्रेक्षकांसाठी घेऊन येणार असल्याचही त्यांनी सांगीतलं.