By  
on  

  EXCLUSIVE : कृष्ण म्हणून मिळणाऱ्या ओळखीच्या आनंदात न राहता आता करियरमध्ये पुढे निघून गेलोय – नितीश भारद्वाज 

80, 90 च्या दशकात पौराणिक मालिकांना प्रचंड महत्त्व होतं. त्यातच 1988मध्ये आलेली महाभारत ही मालिका अजरामर झाली. मालिका, मालिकेचं शिर्षक गीत, प्रत्येक भूमिका साकारणारे कलाकार हे आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. याच मालिकेतील कृष्णाची भूमिका साकारणारे अभिनेता नितीश भारद्वाज पुढे कृष्ण म्हणूनच प्रसिद्ध झाले. त्यानंतरही त्यांनी बरीच कामं केली मात्र त्यांना आजही कृष्णच्या भूमिकेसाठी ओळखलं जातं. नुकतच पिपींगमून मराठीला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत नितीश भारद्वाज यांनी त्यांना आजही कृष्ण म्हणून मिळणारी ओळख कशी वाटते ? आणि बऱ्याच गोष्टी सांगीतल्या.


नितीश भारद्वाज म्हणतात की, “जेव्हा आजही कृष्ण म्हणून ओळख मिळते तेव्हा छान वाटतं. ‘महाभारत’ हे माझ्या करियरची पहिली मोठी सुरुवात म्हणता येईल. माझा त्या भूमिकेतील वाटा हा फक्त 25 टक्के आहे. बाकी 75 टक्के मी, डॉ राही मसूम रझा यांचे संवाद, चोप्राजींचं स्वप्न, रवींजींच ते स्वप्न सत्यात उतरवण्याचं ध्येय यासाठी देतो. ‘महाभारत’ने जो प्रभाव प्रेक्षकांवर पडला त्यामुळेच 30 वर्षांनंतरही मला त्या कामासाठी प्रेम आणि आदर मिळतोय. पण तरीही पुढे पाहतो आणि माझं करियर पुढे सुरु ठेवलय. जर मी त्याच भूमिकेच्या आनंदात राहीलो तर मला एखाद्या स्तब्ध पाण्याच्या तळ्यासारखी दुर्गंधी येईल असं मला वाटतं.”


नितीश यांनी त्यांच्या आगामी प्रोजेक्ट विषयीची माहितीही यावेळी दिली. नितीश सांगतात की, “मी सध्या काही सिनेमा आणि वेब सिरीजच्या स्क्रिप्ट वाचतोय. शिवाय माझ्या ‘चक्रव्यूह’ या हिंदी नाटकाच्या 100 व्या प्रयोगाकडे वाटचाल करतोय. ‘पितृऋण’ या मराठी सिनेमानंतर मी काही सिनेमांसाठी पटकथा लिहील्या आहेत त्यापैकी दोन प्रोजेक्टवर काम करेल, ज्यात मी स्वत: असेल आणि दिग्दर्शनही करेल.”


नितीश भारद्वाज यांनी त्यांच्या करियरची सुरुवात मराठी नाटकांपासून केली होती. बऱ्याच मराठी आणि हिंदी सिनेमांमध्येही त्यांनी काम केलं आहे. ‘महाभारत’ मालिकेतील कृष्णच्या भूमिकेनंतर नितीश भारद्वाज हे ‘गीता रहस्य’, ‘विष्णू पुराण’, ‘रामायण’, ‘मन मे है विश्वास’, ‘अजब गजब घर जमाई’ या टेलिव्हिजन कार्यक्रमांमध्ये दिसले. कृष्णाच्या भूमिके व्यतिरिक्त शिवाय साकारलेले विष्णू आणि रामाच्या भूमिकाही प्रसिद्ध झाल्या होत्या.

Recommended

PeepingMoon Exclusive