मानवी तस्करीसारखं धगधगतं वास्तव मांडणारा तबरेज नुरानी दिग्दर्शित लव सोनिया हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. समराज टॉकीज अंतर्गत लव सोनिया सिनेमाच्या निर्मितीची धुरा सांभाळणा-या आणि मराठी सिनेमांसाठी व कलाकारांसाठी सतत हक्काचा लढा लढणा-या शालिनीताई ठाकरे यांच्यासोबत एक्सक्ल्युझिव्ह बातचित फक्त पिपींगमून मराठीवर.
प्रश्न : मानवी तस्करीसारखा विषय सिनेमाद्वारे अधोरेखित करणा-या लव सोनिया या हिंदी सिनेमाची निर्मिती का करावीशी वाटली?
उत्तर : सर्वप्रथम मी बॉलिवूड सिनेमे करायचं कधी असं ठरवलं नव्हतं. मी या निर्मिती क्षेत्रात फक्त मराठी सिनेमांसाठी आली आहे. ‘लय भारी’सारखा मराठी सिनेमा बॉक्स ऑफीसवर सुपरहिट ठरला. अॅक्शन आणि ड्रामाने भरपूर असलेल्या सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. तेच माझ्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचं होतं. पण लव सोनियाच्या वेळी जरा उलटं झालं,त्याच्या विषयाकडे मी प्रचंड आकर्षित झाले. मला त्या सिनेमासोबत जोडणं जाणं, हे फार मनापासून वाटत होतं. सिनेमा माध्यमातून अनेक विषय तुम्ही प्रेक्षकांसमोर ठेऊ शकता. सिनेमा या माध्यमात खुप मोठी ताकद आहे. आज स्त्री वर्ग मोठ्या प्रमाणावर मानवी तस्करीला बळी पडतोय, म्हणूनच या गंभीर व ज्वलंत प्रश्नावर प्रकाशझोत टाकण्यासाठी मी ‘लव सोनिया’ची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला.
प्रश्न : दिग्दर्शक तबरेज नुरानी आणि इतर सर्व कलाकारांसोबतचा तुमचा या सिनेमाविषयीचा अनुभव कसा होता?
उत्तर : लव सोनिया’चे दिग्दर्शक तबरेज नुरानी यांच्या हातात सिनेमाची संपूर्ण धुरा होती. एक दिग्दर्शक म्हणून त्यांना हवा तसा सिनेमा त्यांनी तयार करावा, असं माझं निर्माती म्हणून मत पहिल्यापासूनच होतं. म्हणूनच निर्माती म्हणून मी फक्त निर्मितीच्या गोष्टींकडेच संपूर्ण लक्ष दिलं. इतर सिनेमांसारखं या सिनेमात नायक-नायिकेची प्रेमकथा नाही. भलेमोठे झगमगते सेट्स नाहीत. या सिनेमाची नायक एक 18 वर्षीय मुलगी आहे. जी या क्षेत्रात फक्त आपल्या बहिणीला सोडवण्यासाठी आली आहे. त्यांच्या संघर्षाचा हा प्रवास आहे, जो आपल्याला विचार करण्यास भाग पाडतो. सिनेमात अनुपम खेर,मृणाल ठाकूर,फ्रिडा पिंटो, डेमी मूर,रिचा चढ्ढा,राजकुमार राव, आदिल हुसैन, मनोज वाजपेयी, सई ताम्हणकर असे एकापेक्षा एक प्रतिभावन कलावंत आहेत. या सर्वांनी सिनेमाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे.
प्रश्न : तुम्ही मानवी तस्करीच्या कचाट्यात सापडलेल्या महिलांच्या पुनर्वसनासाठी वैयक्तिक पातळीवर कधी प्रयत्न केले आहेत,का?
उत्तर : हो. नेहमीच करते. मी फार आधीपासून मराठवाड्यात यावर बरचंस काम केलं आहे. मी तर अशासुध्दा मुलींना पाहिलंय की, त्यांना त्यांचे आईवडील पैशांसाठीच या दलदलीत ढकलतात हे अतिशय हदय पिळवून टाकणारं असं वास्तव आहे. मी माझ्या पध्दतीने हवी ती मदत नेहमीच या महिला व मुलांसाठी करत असते. आज अनेक एनजीओसुध्दा यात खुप महत्त्वाचं काम करतायत पण नेहमीच या विषयावर सरकारकडून मात्र कानाडोळा करण्यात येतो. या मानवी तस्करीच्या कचाट्यात सापडलेल्यांसाठी कधीच प्रत्यक्ष मदत सरकारकडून केली जात नाही. नुकत्याच एका सर्वेक्षणातून असं समोर आलं की गेल्या 17 महिन्यात महाराष्ट्रातून जवळपास 32,000 महिला आणि मुली गायब झाल्या आहेत. पण कुठेच याबाबत मोठ्या प्रमाणावर वाच्यताच झाली नाही. ना सरकारकडून या प्रश्नार आजही कुठलेच प्रयत्न केले जात, नाहीत.
प्रश्न : मराठी सिनेमांना निर्माते मिळत नाही, ही ओरड नेहमीच ऐकायला मिळतेते, तुम्हाला काय वाटतं यावर?
उत्तर : हो नक्कीच, मराठी सिनेमा प्रेक्षकांपर्यंत पोहचविण्यासाठीच मी सिनेनिर्मितीच्या क्षेत्रात आली आहे. हाच माझा या क्षेत्रात उतरण्याचा मुख्य हेतू आहे. जोपर्यंत आपण अनुदानावरतीच जर सिनेमे तयार करत राहिलो, तर कधीचं पुढे जाऊ शकणार नाही. आज महाराष्ट्रात आपल्या स्पर्धेसाठी हिंदी सिनेसृष्टी सज्ज आहे. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर दर्जेदार सिनेमे तयार होतात. एका सामान्य प्रेक्षकाला जर हिंदी सिनेमात सर्वप्रकारचं मनोरंजन मिळत असेल तर तो मराठी सिनेमांकडे का, वळेल? हेच चित्र आपल्याला बदलायचं आहे. मराठी सिनेमा प्रेक्षकांपर्यंत पोहचविण्यासाठीच समराज टॉकीजची मुख्यत्वे स्थापना करण्यात आली आहे, ज्या सिनेमांना मार्केटिंग आणि प्रोमोशनसाठी अडचणी येतात, किंवा जे सिनेमे प्रदर्शित होऊ शकत नाहीत. त्या सिनेमांना मदत करण्यासाठी समराज टॉकीज नेहमीच तत्पर आहे.
शालिनीताई ठाकरे यांना लव सोनिया आणि आगामी मराठी सिनेमांच्या निर्मितीसाठी पिपींगमून मराठीतर्फे खुप खुप शुभेच्छा!