By  
on  

करण जोहर घेऊन येतोय हॉरर सिनेमा; विकी कौशल दिसणार प्रमुख भूमिकेत

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मनमर्जिया सिनेमानंतर विकी कौशलच्या पारड्यात आता आणखी एक सिनेमा पडला आहे. त्याच्या ‘राझी’ सिनेमातील भूमिकेपासून प्रचंड इम्प्रेस झालेला करण जोहर त्याला आपल्या आगामी सिनेमात कास्ट करू इच्छित आहे. मेघना गुलजार दिग्दर्शित राझी सिनेमासाठी करणने सहनिर्मात्याची भूमिका पार पाडली होती.

पिपींगमूनला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,करण आगामी प्रोजेक्टसाठी हॉरर सिनेमा बनवू इच्छितो आणि त्यासाठी तो विकी कौशलला प्रमुख भूमिका साकारण्यासाठी घेणार आहे. मोठी कॉंन्सेप्ट असलेल्या या हॉरर सिनेमाचे दिग्दर्शन भानू प्रताप सिंह करणार असून भानू यांचा हा दिग्दर्शनातील पदार्पणाचा सिनेमा आहे. हम्प्टी शर्मा की दुल्हनियॉं या सिनेमासाठी त्यांनी ‘धडक’फेम दिग्दर्शक शशांक खेतान यांचा सहाय्यक म्हणून काम पाहिलं होतं.

महत्त्वाचं म्हणजे करण जोहर या सिनेमाच्या निमित्ताने दुस-यांदा हॉरर जॉनरचा सिनेमा करण्याचा प्रयोग हाती घेतोय. यापूर्वी 2005 साली करणच्या धर्मा प्रोडक्शनने शाहरुख खानच्या रेड चिली एंटरटेन्मेन्ट प्रोडक्शनसोबत ‘काल’ या हॉरर सिनेमाची निर्मिती केली होती. या सिनेमात जॉन अब्राहम, विवेक ऑबेरॉय, ईशा देओल आणि लारा दत्ता प्रमुख भूमिकेत होते. शाहरुखने या सिनेमात एका पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. आता तब्बल 13 वर्षानंतर करणचा हॉरर सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

परंतु धर्मा प्रोडक्शनचा हा आगामी हॉरर सिनेमा नेमका कशावर बेतला आहे आणि यात आणखी कोणत्या कलाकारांना पाहायला मिळणार हे अद्यापतरी गुलदस्त्यातच आहे. अक्षय कुमार आणि करिना कपूरच्या ‘गुड न्यूज’ सिनेमाबरोबरच या हॉरर सिनेमाच्या शुटींगला सुरुवात होणार असल्याची माहिती मिळते.

सर्वानाच आता करणच्या या हॉरर सिनेमाची उत्सुकता लागून राहिली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive