अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर यांच्यासह हॉर्न ओके प्लिज सिनेमाचे निर्माते सामी सिध्दीकी, दिग्दर्शक राकेश सारंग आणि कोरियोग्राफर गणेश यांच्याविरोधात बुधवारी जबाब नोंदविल्यानंतर या चौघांविरोधात ओशिवरा पोलिसांनी आता गुन्हा दाखल केला आहे.
पिपींगमूनच्या हाती एक्सक्ल्युझिव्हरित्या तनुश्री दत्ताने या चौघांविरोधात नोंदवलेल्या जबाबाची कॉपी लागली आहे.
अमेरिकेहून परतलेल्या तनुश्री दत्ताने आत्ता 10 वर्षांतर हे प्रकरण उकरुन काढल्यानंतर संपूर्ण बॉलिवूडसह सर्वसामान्यसुध्दा प्रचंड हादरले आहेत आणि त्यात सर्वच स्तरातून याप्रकरणी संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसून येत आहेत. राजकीय पक्षांनीसुध्दा या वादात नानांच्या बाजूंनी ठामपणे उभी राहण्याची कणखर भूमिका घेतलीय.
काहीचं मत आहे की, सिनेसृष्टीत असे प्रकार जाणीवपूर्वक दाबून टाकले जातात. याविरुध्द आवाज उठवणं गरजेचं आहे. तर काही म्हणतात याप्रकरणी तनुश्रीने सबळ पुरावे सादर करावेत, त्यानंतरच निष्कर्ष काढला जाऊ शकतो.
चौघांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता नाना पाटेकर आणि तनुश्री दत्ता वादाला कोणतं नवीन वळण प्राप्त होतंय हे येणारा काळच ठरवेल