बॉलीवूडमधील सध्याचा आघाडीचा सुपरस्टार रणवीर सिंहने २०१० साली यशराज फिल्म्सच्या 'बँड बाजा बारात' या सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. सध्या यशराज फिल्म्स एका नवोदित अभिनेत्रीच्या शोधात आहेत जी यशराजच्या आगामी ‘जयेशभाई जोरदार’ या सिनेमात झळकणार आहे. हा आगामी सिनेमा गुजराती भाषेची पार्श्वभूमी असलेला विनोदी सिनेमा असणार आहे.
सध्या रणवीर सिंग '83' या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमाचं शूटिंग संपल्यावर ऑक्टोबर पासून रणवीर या आगामी सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. दिव्यांग ठक्कर हे या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत. दिग्दर्शक म्हणून हा त्यांचा पहिलाच सिनेमा असणार आहे. मनीष शर्मा यांनी या सिनेमांची निर्मिती केली आहे.
रणवीर या सिनेमात जयेशभाईची प्रमुख व्यक्तिरेखा साकारत आहे. या सिनेमाविषयी रणवीर सिंग म्हणला,''सर्व वयोगटातल्या लोकांसाठी हा सिनेमा असणार आहे. हा सिनेमा विनोदी असून याची कथा खूप मनोरंजक आहे. सिनेरसिकांना हा सिनेमा नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे. माझ्यापर्यंत आजवर ज्या कथा आल्या आहेत त्यापैकी ही कथा खूप रंजक आहे.''
अलीकडेच पिपिंगमुनने दिलेल्या एक्सक्लुसिव्ह माहितीनुसार २००५ साली आलेल्या 'बंटी और बबली' या सिनेमाच्या सीक्वलमध्ये अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जीसोबत अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीसुद्धा महत्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. या सिनेमातसुद्धा सिद्धांतसोबत नवोदित अभिनेत्रीच हिरोइन म्हणून असणार आहे. या दोन्ही सिनेमांची यशराज बॅनरतर्फे लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येईल. सर्वांनाच यशराजच्या या दोन आगामी सिनेमांची प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे.