बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान सध्या अनेक मोठ्या प्रोजेक्टचा भाग आहे. अजय देवगणच्या 'तानाजी', नवदीप सिंहच्या 'लाल कप्तान' आणि नेटफ्लिक्सच्या 'सेक्रेड गेम्स 2' या प्रोजेक्टचं शूटिंग त्याने संपवलं आहे. सध्या सैफ 'जवानी जानेमन'चं लंडनला शूटिंग करत आहे. तसेच आमिर खानची प्रमुख भूमिका असलेल्या 'विक्रम वेधा'च्या हिंदी रिमेकमध्ये सुद्धा सैफ झळकणार आहे. 'जिगरठंडा'च्या फिल्ममेकर्स सोबत सुद्धा सैफ अली खानची बोलणी सुरु आहे. त्यामुळे सैफ अली खानच्या करियरची गाडी सध्या सुसाट आहे.
पिपिंगमुनला मिळालेल्या एक्सक्लुझिव्ह माहितीनुसार 'जवानी जानेमन'नंतर सैफने आणखी एका प्रोजेक्टला होकार दिला आहे. अली अब्बास जफरच्या आगामी राजकीय थ्रिलरपट असलेला 'तांडव' मध्ये सैफ अली खान प्रमुख भूमिका साकारणार आहे. हा शो अमॅझॉन प्राईमवर येणार आहे, अशा अफवा मागील काही दिवसांपूर्वी चर्चेत होत्या. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 'तांडव' हा शो ड्रामा थ्रिलर असून ऑक्टोबरपासून या शो च्या शूटिंगला सुरुवात होईल.
'तांडव' हा बिग बजेट शो असून १२ प्रमुख व्यक्तिरेखा या शो मध्ये पाहायला मिळणार आहेत. एक विद्यार्थी कार्यकर्ता आणि एक राजकीय नेता यांच्यामध्ये द्वंद्व पाहायला मिळणार आहे. सैफ अली खान विद्यार्थी कार्यकर्त्याची भूमिका साकारत आहे. अभिनेत्री कृतिका कामरा जी 'मित्रो' या सिनेमात झळकली होती. ती या शोमध्ये सैफ अली खान सोबत महत्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे.
भारतीय राजकारणामागचा काळा चेहरा 'तांडव'मधून लेखक गौरव सोलंकी दाखवणार आहेत. गौरव सोलंकी यांनी 'आर्टिकल 15' या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सिनेमाचं सहलेखन केलं होतं. शक्तिशाली राजकारणी सामान्य जनतेसोबत कसे अन्यायकारक वागतात आणि दुसऱ्या देशांसोबत हेराफेरीचं राजकारण कसं करतात, याची रंजक गोष्ट 'तांडव'मधून पाहायला मिळणार आहे.