ऋतिक रोशन स्टारर 'सुपर 30' सिनेमाने बॉक्स ऑफीसवर बक्कळ कमाई तर केलीच पण ऋतिकच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनंसुध्दा जिंकली. आता लवकरच ऋतिक आणि टायगर श्रॉफ स्टारर वॉर हा अॅक्शन थ्रीलर सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ऋतिकच्या चाहत्यांना या सिनेमाची प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे. पण 'वॉर'बद्दल सर्वांनाच माहितीय पण त्यानंतर हा बॉलिवूडचा ग्रीक गॉड कुठला प्रोजेक्ट हाती घेणार याची चर्चा सर्वत्र सध्या रंगली आहे. PeepingMoon.com च्या हाती आलेल्या एक्सक्ल्युझिव्ह वृत्तानुसार ऋतिकने राजकुमार गुप्ता यांचा 'ब्लॅक टायगर' सिनेमा नाकारला आहे.
ऋतिकच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, " ऋतिक आता 'सुपर 30' नंतर लगेचच कोणतीही बायोपिक फिल्म करु इच्छित नाही. म्हणूनच त्याने फारच नम्रतेने गुप्ता यांना ह्या सिनेमासाठी नाही म्हटलं आहे. हा सिनेमा भारताचे महान जासूस रविंद्र कौशिक यांच्या जीवनावर आधारित आहे. " तर दुस-या एका सूत्राच्या म्हणण्यानुसार गुप्ता यांच्या सिनेमाची कथा जॉन अब्राहम स्टारर 'रोमियो अकबर वाल्टर' सिनेमाशी मिळती-जुळती होती आणि हा सिनेमा बॉक्स ऑफीसवर नुकताच सपशेल अपयशी ठरला होता, म्हणूनच ऋतिकने गुप्ता यांची कथा नाकारली. तसंच त्याला आत्ता फक्त कमर्शियल सिनेमांवरच आपलं लक्ष केंद्रित करायचं आहे, असंही बोललं जात आहे.
तसंच ऋतिक फराह खानच्या 'सत्ते पे सत्ता'च्या रिमेकसाठी रोहित शेट्टीसोबत काम करणार असल्याची बरीच चर्चा रंगली. पण अद्यापतरी त्याने अधिकृतरित्या हा सिनेमा साईन केलेला नाही. जेव्हा तो हा सिनेमा अधिकृतरित्या स्विकारेल तेव्हाच तो त्याची घोषणाही करेल असं त्याने सांगितलं आहे.