सलमान खान स्टारर आणि संजय लीला भन्साली दिग्दर्शित 'इंशाअल्लाह' सिनेमासंदर्भात एक खळबळजनक माहिती सर्वांना नुकतीच समजली, ती म्हणजे ह्या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. ही माहिती खुद्द सलमान खाननेच आपल्या ट्विटरवरुन दिली होती. या सिनेमात सलमानसोबत आलिया भट्ट प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. पण आता सलमाननेच ईद 2020 रोजी 'इंशाअल्लाह' रिलीज होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. आता हा सिनेमा पुढील वर्षी म्हणजेच डिसेंबर 2020ला रिलीज होईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे चाहत्यांची घोर निराशा झाली आहे.
आत्ता नुकतंच संजय लीला भन्साळी यांच्या भन्साली प्रोडक्शनतर्फेसुध्दा एक ट्विट करण्यात आलं आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय, की "सध्या तरी 'इंशाअल्लाह' सिनेमासंदर्भात पुढे जाण्याचं भन्साळी प्रोडक्शनने थांबविण्याचा निर्णय घेतला आहे.तसंच पुढील घोषणा लवकरच होईल" असंसुध्दा स्पष्ट करण्यात आलं आहे. तसंच देवाची इच्छा असंसुध्दा नमूद केलं आहे.
Bhansali Productions has decided to not go ahead with In-shaa-Allah for now... Further announcement will be out soon... God willing@prerna982
— BhansaliProductions (@bhansali_produc) August 26, 2019
दरम्यान पिपींगमूनला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'इंशाअल्लाह' ची रिलीज डेट पुढे ढकलण्यामागे सलमान खान आणि भन्साळी यांच्यातील कलात्मक मतभेद असल्याचं सांगितलं जात आहे. 1999 साली हम दिल दे चुके सनम हा सुपरहीट सिनेमा देणा-या ह्या जोडीचा इतक्या वर्षानंतर प्रथमच एका सिनेप्रोजेक्टवर एकमत नसल्याचा अभाव निदर्शनास आला आहे. तसंच सिनेमाच्या पूर्व प्लॅनिंगनुसार ह्या महिन्यात पहिलं शेड्यूल अमेरिकेत होणार होतं पण त्यापूर्वीच हे असं चित्र समोर आलं. सिनेमाची नायिका आलिया भटला इतकं मोठं प्रोजेक्टवर अंतर्गत मतभेदामुळे पाणी सोडण्याची वेळ येणार असंच दिसून येतंय. तर 'इंशाअल्लाह' सिनेमाचं भविष्य अधांतरीच असून येणारा काळच सर्वकाही ठरवेल.