शंकर दिग्दर्शित आणि रजनीकांत स्टारर 2.O सिनेमात अक्षय कुमार प्रमुख भूमिका साकारतोय, हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. पण तुम्हाला हे माहितीय खुद्द बॉलिवूड खिलाडीनेच स्वत:चा हा बिग बजेट आणि महत्त्वकांक्षी सिनेमा अद्याप पाहिलेला नाही. तर त्याचं झालं असं, अक्षय कुमार आपला मित्र किशोर आणि माला समतानी यांची मुलगी दिव्याच्या डेस्टिनेशन वेडिंगला उपस्थित राहण्यासाठी थायलंडला गेला होता, म्हणून तो सिनेमा पाहू शकला नाही.
पण आत्ता अक्षय कुमार मुंबईत परतल्यानंतर पहिल्यांदा काही महत्त्वाचं करणार आहे, ते लेक नितारासोबत स्वत:चा सिनेमा 2.O सिनेमागृहात जाऊन पाहणार आहे. छोट्याशा निताराला या सिनेमाबाबत आणखी काहीच माहिती नाहीय, तिला फक्त एवढंच कळतंय की आपल्याला पप्पांचा सिनेमा पाहायचाय. निताराला आपल्या वडिलांचा सिनेमा त्यांच्यासोबतच पाहण्याचा तिचा बालहट्ट आहे.
मागच्याच आठवड्यात कुठलीही सुट्टी नसताना गुरुवारी प्रदर्शित झालेल्या 2.O सिनेमाने एकदम जबरदस्त रकॉर्डेब्रेक कमाई करत बॉक्स ऑफीसवर जबरदस्त ओपनिंग केली. तमिळ, तेलुगू आणि हिंदीत प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने गुरुवारी ओपनिंगलाच 19.50 कोटी कमावले. आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार सिनेमाने हिंदीत 95 कोटींची कमाई केलीय.