दर्जेदार अभिनयाच्या जोरावर अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलेला अभिनेता म्हणून विकी कौशलची ओळख आहे. अलीकडे तो 'उरी' या सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त होता. यात तो सर्जिकल स्ट्राइक मोहिमेचा भाग असलेल्या सैनिकाच्या व्यक्तिरेखेत आहे. या मोहिमेचं नेतृत्व सांभाळत असलेल्या नायकाच्या भूमिकेत खुलुन दिसण्यासाठी विकीने बरीच मेहनत घेतली आहे.
विकी मेघना गुलजार यांच्या 'राझी' या सिनेमाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त असतानाच त्याला उरीमधील व्यक्तिरेखेची ऑफर आली होती. राजीमध्ये विकी एका पकिस्तानी अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसला होता. आलिया भटसारख्या सर्वोत्तम अभिनेत्रीसोबत काम करतानाही विकीने तिच्या तोडीस तोड अभिनय साकारून प्रत्येकाची वाहवा मिळवली.
त्याच प्रमाणे उरीमधील भूमिकेसाठी कौतुकास पात्र ठरेल अशीच मेहनत तो घेताना दिसून येत आहे.
उरीमधील भूमिका साकारणं विकिसाठी अजिबात सोपं नव्हतं. त्यासाठी त्याने तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये दिवसाचे सलग पाच तास ट्रेनिंग घेतलं. शारीरिकदृष्ट्या थकवणाऱ्या या कालावधीत तो परेड ग्राउंड ला नित्यनेमाने 20 राऊंड मारायचा. याशिवाय खाण्या-पिण्यावर देखील अनेक बंधनं होती. या कालावधीत त्याने सगळ्यात आवडता पिझ्झादेखील खाल्ला नव्हता. त्यामुळे शूटिंग संपताचक्षणी त्याने पिझ्झा खाण्याची हौस भागवून घेतली. या चित्रपटाचं शूटिंग सर्बिया येथे झालं. शूटिंग दरम्यान सैनिकांचं आयुष्य जवळून अनुभवण्याची संधी मिळाल्याने विकीचा त्यांच्या बद्दलचा आदर वाढला.
https://www.instagram.com/p/BoQMqKbFk9x/?utm_source=ig_embed
उरी या सिनेमाची कथा पाकिस्तानवर 2016मध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईक वर बेतलेली आहे. या सिनेमाचं शूटिंग जूनमध्ये सुरू झालं होतं ते सप्टेंबर अखेर संपलं. भारताने पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन राबवलेल्या या मोहिमेचं जगभरात कौतुक झालं होतं. याशिवाय पाकिस्तानला चांगली चपराक बसली होती. त्यामुळे या मोहिमेचा थरार पडद्यावर पाहणं ही प्रेक्षकांना पर्वणी असणार आहे.