By  
on  

Exclusive : कॉपी केली नसती तर अभिनयाच्या क्षेत्रात लवकर आलो असतो : इमरान हाश्मी

देशातील शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करणारा सिनेमा ‘व्हाय चीट इंडिया’ प्रदर्शनापूर्वीपासूनच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरला आहे. सौमिक सेन यांचं दिग्दर्शन असलेला हा सिनेमा प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर आहे. या पार्श्वभूमीवर नायक इमरान हाश्मी याची पीपिंगमूनने घेतलेली मुलाखत. विशेष म्हणजे इमराननेही मान्य केलं की सिडनेहॅम कॉलेजमध्ये त्याला अर्थशास्त्रात ७५टक्के मार्क मिळाले होते. पण हे मात्र त्याने कॉपी करून मिळवले होते. हा अनुभव त्याने या मुलाखतीवेळी शेअर केला.

तुझं कॉलेजलाईफ कसं होतं?

सिड्नेहॅम कॉलेजमध्ये मी माझ्या आयुष्याची पाच वर्षं वाया घालवली. मी कॉमर्स शाखेचा विद्यार्थी होतो. मला आर्ट्स ला अ‍ॅडमिशन घ्यायचं होतं. पण त्यावेळी आर्ट्सला जाणारा विद्यार्थी कमी दर्जाचा मानलं जात असे. त्यामुळे शाळेनेही कधी आमच्यातील कलेला वाव दिला नाही. याउलट आम्ही केवळ अभ्यासू किडा बनावं यावर भर दिला गेला. मी अनेकदा कॉपी केली आहे. मला अभिनेता बनायचं होतं. माझं करीअर गोल मला माहीत असूनही केवळ चांगले मार्क पडावेत यासाठी माझ्यावरही दबाव यायचा. कॉपी करून पास झाल्यामुळेच या क्षेत्रात यायला उशीर झाला अन्यथा लवकर आलो असतो.

 

‘व्हाय चीट इंडिया’ ही तुझी स्टोरी आहे असं म्हणलं तर चालेल का?

ही माझी स्टोरी नक्कीच नाही. पण यातील काही भाग माझ्या आयुष्याशी निगडीत नक्कीच आहे. शिक्षण व्यवस्था केवळ विशिष्ट चौकटींशी बांधील राहिल्यास त्याचा कशाप्रकारे फायदा घेतला जातो हे या सिनेमात दाखवलं आहे. या सिनेमातील माझ्या व्यक्तिरेखेचा तुम्हाला रागही येऊ शकतो. पण एकीकडे तुम्हाला त्यामागचं लॉजिकदेखील पटत असतं.

‘व्हाय चीट इंडियामधून तू काय सांगू इच्छितोस?

या सिनेमात शिक्षण क्षेत्रातील आंधळेपणा दाखवला गेला आहे. आपण काही बाबी इतक्या आंधळेपणाने स्विकारल्या आहेत की त्यात आता बदल करणं गरजेचं आहे ही मानसिकता कुणाचीच नाही. प्रत्येकालाच टॉप करायचं असतं. या हव्यासापायी मुलांचे पालक वाटेल ते करायला तयार असतात. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील दलालांचं आयतं फावतं. हे टाळायचं तर सर्व स्तरातून प्रयत्न करणं तितकंच गरजेचं आहे.

 

https://www.youtube.com/watch?v=LHaWD4KIWm0

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive