कोरोनाचा प्रभाव सगळीकडे होताना दिसत आहे. जगभर भितीचं थैमान घातलेल्या या आजाराने आता भारतातही प्रभाव दाखवण्यास सुरुवात केली आहे. भारतात जिवीतहानी झाली नसली अप्रत्यक्ष फटका अनेक क्षेत्रांना बसला आहे. त्यापैकी एक आहे बॉलिवूड. परदेशात कोरोनामुळे अनेक ठिकाणी संचारबंदी लागू असल्यामुळे बिग बजेट सिनेमे परदेशात रिलीज होत नाहीयेत.
सध्या बॉलिवूडच्या नजरा बागी 3 वर खिळल्या आहेत. टायगर श्रॉफ श्रद्धा कपूर यांच्या अॅक्शनने सजलेला हा सिनेमा आज रिलीज होतोय. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रेक्षक मल्टीप्लेक्ससारख्या ठिकाणी गर्दी करतील का ही शंका निर्मात्यांना आहे. हॉलिवूडनेही जेम्स बाँडचा 25 वा सिनेमा ‘नो टाईम टू डाय’ ची रिलीज डेट पुढे ढकलली आहे. एप्रिलमध्ये रिलीज होणारा हा सिनेमा नोव्हेंबरमध्ये रिलीज होणार आहे. हा बदल MGM स्टुडियोजला जवळपास 30 मिलियन डॉलर्सना पडला आहे.
पुढील 3 महिने बॉलिवूडकरांसाठी महत्त्वाचे आहेत. कारण, या महिना अखेरीस रोहित शेट्टी दिग्दर्शित सुर्यवंशी सिनेमा रिलीज होत आहे. त्याच्य आधीच्या आठवड्यात इरफान खान, करीना कपूरचा अंग्रेजी मिडियम’ प्रेक्षकांच्या समोर येत आहे. एप्रिलमध्ये कबीर खानचा ‘83’, शुजित सरकारचा ‘गुलाबो सिताबो’ याशिवाय धर्मा प्रॉडक्शनचा ‘गुंजन सक्सेना रिलीजच्या तयारीत आहेत. याशिवाय कुली नं 1, सलमानचा राधे: युअर मोस्ट वॉटेंड भाई, अक्षयचा ‘लक्ष्मीबाँब’ हे सिनेमे रिलीज होणार आहेत. कोरोना प्रादुर्भाव असाच राहिला तर सिनेमाच्या कलेक्शनवर याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.