बॉलिवुडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितचे ठुमके आपण ती जज करत असलेल्या डान्स रिएलिटी शोमधून पाहत आलो आहोत. लवकरच ही सौंदर्यसम्राज्ञी आपल्या वेब डेब्यूसाठी सज्ज झाली आहे. पिपींगमूनला मिळालेल्या एक्सक्ल्युझिव्ह वृत्तानुसार माधुरी दीक्षित एका रहस्यमयी फॅमिली ड्रामा असलेल्या वेबसिरीजमध्ये झळकतेय. करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनची धर्माटिक एन्टरटेन्मेन्ट याची निर्मिती करतेय. तर नेटफ्लिक्सवर 'द हिरोईन' असं या नव्या को-या वेबसिरीजचं नाव आहे.
मेकर्सने यापूर्वी दोन-तीन नावं फायनलाईज केली होती परंतु 'द हिरोईन' हे नाव कथेच्या अनुषंगाने चपखल बसत असल्याने त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. न्यू यॉर्कस्थित दिग्दर्शक श्री राव यांनी या वेबसिरीजची कथा लिहली असून तेच याचं दिग्दर्शनसुध्दा करतायत. व या वेबसिरीजच्या प्री-प्रोडक्शनलासुध्दा सुरुवात झाली आहे. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सिनेमातल्या इतर कलाकारांचा अद्याप उलगडा होऊ शकलेला नाही. असंही म्हटलं जातं की, ही वेबसिरीज माधुरीच्या जीवनावर आधारित आहे. झगमगत्या दुनियेपासून दूर जात डॉ. श्रीराम नेने यांच्यासोबत तिने लग्नानंतर यूएसमध्ये संसार थाटला. असंच काहीसं कथानक या वेबसिरीजमध्ये सुध्दा पाहायला मिळणार असल्याचं बोललं जात आहे.
माधुरी आण् नेटफ्लिक्सचं नातं काही नवं नाही. माधुरी दीक्षितची निर्मिती असलेला 15 ऑगस्ट हा मराठी सिनेमा नेटफ्लिक्सवरच प्रदर्शित झाला होता. खुद्द माधुरी दीक्षितसुध्दा आपल्या पहिल्या वहिल्या वेबसिरीजसाठी खुप उत्साही आहे. माधुरी म्हणते कॅमेरासमोर येणं माझ्यासाठी नवीन नाही. तो मला नेहमीच आनंद देतो.पण हे माध्यम माझ्यासाठी खुप नवीन आहे. हा एक नवा अनुभव असेल. त्यामुळे मी एकाचवेळी उत्साही व नर्व्हसपण आहे.