‘चुंबक’ या आगामी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गीतकार-लेखक आणि दिग्दर्शक स्वानंद किरकिरे अगदी पहिल्यांदाच मराठी सिनेमात प्रमुख भूमिका साकारत आहेत. या सिनेमाच्या ट्रेलरमधून दोन तरुण चेहरे सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. संग्राम देसाई आणि साहिल जाधव हे तरुण चेहरे या सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत. यातील तीन मध्यवर्ती व्यक्तीरेखांपैकी एक असलेली ‘डिस्को’ची भूमिका कोल्हापूरचा संग्राम देसाई करत आहे. तर ‘बाळू’ ही व्यक्तिरेखा सिनेसृष्टीत पदार्पण करणाऱ्या पुण्यातील साहिल जाधवने साकारली आहे. तो आपले स्वत:चे रसवंतीगृह टाकण्याचे छोटेसे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडतो आहे. तो त्यासाठी एका हॉटेलात वेटरचे काम करतो आहे.
‘चुंबक’सिनेमाविषयी Peepingmoon.com ने नुकतीच ‘डिस्को’ची भूमिका साकारणा-या संग्राम देसाईसोबत बातचित केली. तेव्हा संग्राम म्हणाला, “सिनेमा करताना आम्हाला माहित नव्हतं की हा सिनेमा कोण प्रस्तुत करत आहे. मी आणि साहिलने सहज एकदा आमचे दिग्दर्शक संदीप मोदीजी यांना विचारले की आपला सिनेमा कोण प्रस्तुत करतंय. तेव्हा ते अगदी हळूच म्हणाले, अक्षय कुमार आणि आमचा आनंद गगनात मावत नव्हता आम्ही दोघंही त्या क्षणी अक्षरश: नाचायला लागलो. आमच्यासाठी यापेक्षा कुठली मोठी गोष्ट असूच शकत नाही. लहानपणापासून आम्ही त्यांचे सिनेमे पाहतोय. त्यांचे सिनेमे म्हणजे एक मोठी पर्वणीच असते.”
अक्षय कुमार यांच्यासोबतच्या पहिल्या भेटीबद्दल संग्रामला विचारले असता तो सांगतो, “चुंबकच्या एका मुलाखती दरम्यान मी, साहिल आणि अक्षयजी पहिल्यांदा भेटलो होतो. तो क्षण अविस्मरणीय होता. त्यांनी हसून आमचं स्वागत केलं. मग मुलाखतीपूर्वी आणि नंतरसुध्दा आम्ही भरपूर गप्पा मारल्या. त्यांनी सिनेमातील आमच्या भूमिकांचं भरपूर कौतुक केलं. आमचा अभिनय त्यांना मनापासून आवडला.”
अक्षय कुमार यांनी दिलेल्या खास टिप्सबद्दल संग्राम पुढे म्हणाला, “ या पहिल्या भेटीत अक्षयजींनी आम्हा दोघांना काही महत्त्वपूर्ण टिप्स दिल्या आहेत. ते म्हणाले, आयुष्यात कुठलंही काम करा, पण ते मनापासून करा. तुमच्यातील निरागसतेला कधी हरवू देऊ नका.” अक्षयजींनी दिलेल्या या खास टिप्स आम्ही नेहमी लक्षात ठेऊ आणि याचा आम्हाला आमच्या करिअरसाठी फार मोलाच्या आहेत, असे सागंत संग्रामच्या चेह-यावरचा आनंद ओसंडून वाहत होता.