सध्या करोना संकटामुळे जग खुपच बदललं आहे, त्यामुळे अनेक गोष्टी पहिल्यांदाच घडत आहेत. अनेक मोठमोठे व आश्चर्यकारक निर्णय घेतलेले आपल्याला पाहायला मिळतातयत. लॉकडाऊनमुळे जवळपास दोन महिने झाले सिनेमा थिएटर्स बंद आहेत, त्यामुळे अनेकांनी सिनेमे प्रदर्शित करण्यासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मचा आधार घेतला आहे. यात नुकतीच पिपींगमूनच्या हाती एक एक्सक्ल्युझिव्ह खबर मिळाली आहे, ती म्हणजे Disney+ Hotstar हा ओटीटी प्लॅटफॉर्म Amazon Prime Video च्या पावलावर पाऊल ठेवत आता तब्बल ८ नवे बॉलिवूड सिनेमे प्रदर्शित करण्याच्या तयारीत आहे.
सूत्रांनी पिपींगमूनला दिलेल्या माहितीनुसार, Disney+ Hotstar वर अक्षय कुमारचा लक्ष्मी बॉम्ब, अजय देवगणचा भूज -द प्राईड ऑफ इंडीया, महेश भट्टचा सडक २, अभिषेक बच्चनचा बिग बुल, क्रिती सेनॉनचा मिमी, सनी कौशलचा शिद्दत, सुशांत सिंग राजपूतचा दिल बैचारा आणि कुणाल खेमूचा लुटकेस हे सिनेमे प्रदर्शित होणार आहेत.
ही सर्व बोलणी झाल्यानंतर पुढच्या आठवड्यात या सिनेमांचे अभिनेते जसे की अक्षय कुमार, संजय दत्त, अजय देवगण, क्रिती सेनॉन आदी आपल्या सोशल मिडीयावरुन त्यांच्या ओटीटी रिलीजची घोषणा करतील. लाईव्ह व्हिडीओ अथवा प्रोमो शूट करुन ह्या सिनेमांच्या प्रदर्शनाची घोषणा होऊ शकते.
तसंच तज्ञांच्या मते, हे सर्व मोठे सिनेमे जर थिएटरमध्ये प्रदर्शित झाले असते तर 150 ते 200 कोटींचा गल्ला त्यांनी बॉक्स ऑफीसवर कमावला असता. परंतु Disney+ Hotstar या लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्मनेसुध्दा प्रचंड मोठ्या व रेकॉर्डब्रेक रकमेवर या सिनेमांचे हक्क प्रदर्शनासाठी विकत घेतल्याचं समजतंय. तसंच सिनेमा परिपूर्ण तयार आहे की नाही, याबाबत बोलायचं झालं तर लॉकडाऊनपूर्वीच हे सिनेमे पूर्ण झाले होते. फक्त काही थोडीफार पॅचवर्कची कामं उरली आहेत. पण आता राज्यसरकारने सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत शूटींगला परवानगी दिल्याने तीसुध्दा कामं लवकरच पूर्ण होतील व ओटीटीवर हे सर्व सिनेमे येत्या तीन महिन्यात रसिकांच्या भेटीला येतील.
अक्षय कुमारच्या लक्ष्मी बॉम्ब सिनेमाची प्रदर्शनापूर्वीच बरीच चर्चा रंगली होती. हा एक हॉरर कॉमेडी सिनेमा असून राघव लॉरेन्स यांनी त्याचं दिग्दर्शन केलं आहे. एका तृतीयपंथीयाच्या अंगात भूत शिरल्यावरची ही कथा असल्याने चाहते यासिनेमाबाबत बरेच उत्सुक आहेत.