रॉनी स्क्रुवाला आणि सिद्धार्थ रॉयकपूर यांची निर्मिती असलेल्या ‘सारे जहां से अच्छा’ या सिनेमाला मुहुर्त लागण्याची तुर्तास तरी शक्यता दिसून येत नाहीये. कारण या सिनेमात काम करण्यास रणबीरनेही नकार दिला आहे.
पीपिंगमूनला मिळालेल्या माहितीनुसार या सिनेमात काम करण्यासाठी रणबीरला विचारलं गेलं होतं. पण त्याच्या हातात धर्मा प्रॉडक्शनचा एक सिनेमा असल्याने त्याने या सिनेमाला नकार दिल्याचं समजत आहे. हा सिनेमा भारताचे पहिले अंतराळवीर स्वाड्रन लीडर राकेश शर्मा यांचा बायोपिक आहे. सिनेमात सर्वप्रथम आमीरची मुख्य भूमिकेसाठी निवड झाली होती. पण आमीरने शाहरुखचे नाव या व्यक्तिरेखेसाठी योग्य असल्याचं सुचवलं होतं. पण शाहरुखला ‘डॉन ३’ वर लक्ष केंद्रित करायचं असल्याने त्यानेही या सिनेमाला नकार दिला. त्यानंतर विकी कौशल या सिनेमात काम करणार अशी चर्चा होती. पण विकी आधीच एका बायोपिकशी जोडला गेला असल्याने विकी या सिनेमात काम करण्याची शक्यताही मावळली. त्यानंतर रणबीरला या भूमिकेबद्द्ल विचारलं गेलं. पण त्यानेही नकार दिल्याने या सिनेमाचं भविष्य सध्यातरी अधांतरीच आहे.