‘माझ्या नव-याची बायको’ला शनाया करणार रामराम?

By  
on  

‘माझ्या नव-याची बायको’ ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर सध्या अधिराज्य गाजवते आहे. राधिका, गुरू आणि शनाया या प्रेमत्रिकोणाच्या मालिकेतील व्यक्तिरेखा आज प्रचंड लोकप्रिय ठरत आहे. या मालिकेत युवा पिढीचं नेतृत्व करणारी आणि बेधुंद व मनोसक्त वागणारी शनाया नेहमीचं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरते. गुरूची गर्लफ्रेंडच्या या महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखेला अभिनेत्री रसिका सुनीलने पुरेपूर न्याय दिला आहे. भूमिका जरी निगेटिव्ह असली तरी पडद्यावर ती तंतोतंत साकारल्याने रसिकाला नेहमीच प्रेक्षकांची पसंती मिळालीय. पण आता महत्त्वाचं म्हणजे, या मालिकेला रसिका लवकरच रामराम ठोकणार असल्याचे वृत्त आहे.

शनाया म्हणजेच रसिका मालिका सोडणार असल्याची चर्चा रंगली आहे. सिनेनिर्मिती आणि दिग्दर्शनाचं शास्त्रशुध्द शिक्षण घेण्यासाठी रसिका न्यूयॉर्कला रवाना होणार असल्याचे समजते आहे. तिने या मालिकेच्या पुढील काही भागांचे चित्रिकरण पूर्ण केले असून, सर्वांना गुड बाय करण्याची तयारीसुध्दा केली आहे.

रसिकाच्या या एक्झिटमुळे तिच्या जागी नवी शनाया कोण होणार, की शनायाची व्यक्तिरेखाच काढून टाकणार अशा चर्चांना उधाण आले आहे. यात अजुन एक ट्विस्ट आला आहे, तो म्हणजे ‘माझ्या नव-याची बायको’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत असल्यानेच रसिकाने मालिका सोडण्याचा निर्णय घेतल्याचेही बोलले जात आहे. मालिकेत सध्या राधिका-गुरूनाथ यांच्या घटस्फोटाचं नाट्य रंगत आहे. यात गुरूनाथमुळे राधिकाला प्रचंड मानसिक ताण सहन करावा लागत असून गुरूच्या खोट्या वागण्याने तो आईलासुध्दा स्वत:च्या बाजूने वळवतोय. ही केस कोण जिंकणार, ऑफिसमध्येसुध्दा गुरू राजीनामा देणार का आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो आणि शनाया एकत्र येणार का, या सर्वांची उत्तरं प्रेक्षकांना येणा-या भागात मिळणार आहेत.

Recommended

Loading...
Share