स्टार प्रवाहवरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेचं कथानक सध्या रंगतदार वळणावर आलय. सुडाने पेटलेली शालिनी संपूर्ण शिर्केपाटील कुटुंबाला आपल्या तालावर नाचवते आहे. घराचा आणि कंपनीचा ताबा तर तिने घेतलाच आहे. मात्र ही मालमत्ता परत हवी असल्यास माझ्यासोबत कबड्डीचा डाव जिंकावा लागेल अशी अट तिने घातली आहे. त्यामुळे शिर्केपाटील कुटुंबासमोर सामना जिंकण्याचा एकमेव पर्याय उरला आहे. कबड्डीचा सामना खेळायचा म्हणजे प्रशिक्षक हवा. त्यामुळे कबड्डी प्रशिक्षकाच्या भूमिकेत मिलिंद शिंदे यांची एण्ट्री होणार आहे.
या भूमिकेविषयी सांगताना मिलिंद शिंदे म्हणाले की, "मी कोचच्या भूमिकेत दिसणार आहे. भैरु असं त्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. मी पहिल्यांदाच प्रशिक्षकाची व्यक्तिरेखा साकारतो आहे. मी दिल्लीला शिकायला होतो तेव्हा काही शाळा आणि कॉलेजमध्ये वर्कशॉप घ्यायचो. त्याचीच मदत मला ही व्यक्तिरेखा साकारताना होते आहे. मी कबड्डी कधीच खेळलो नाहीय. शाळेत असल्यापासून फक्त आणि फक्त नाटक केलं आहे. मला क्रिकेट खेळायला आवडतं पण मला जमत नाही. त्यामुळे ही भूमिका नक्कीच आव्हानात्मक आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका आणि या मालिकेतल्या प्रत्येक पात्रावर प्रेक्षक मनापासून प्रेम करतात त्यामुळे या मालिकेचा भाग होता आला याचा आनंद आहे.’
तेव्हा या मालिकेत आलेलं हे नवं वळण पाहणं महत्त्वाचं ठरेल.