लॉकडाउनच्या काळात गेली का्ही महिने मनोरंजन विश्वाचं चित्रीकरण बंद होतं. मात्र नुकतच शासनाने सांगीतलेल्या नियमांचे पालन करत मालिका विश्वाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. काम पुन्हा सुरु झाल्याने कलाकार आनंदी झाले आहेत. आणि सेटवर पुन्हा परतल्याचा आनंद व्यक्त करताना दितस आहेत.
'झी युवा' वाहिनीवरील मालिका 'डॉक्टर डॉन' च्या चित्रीकरणालाही नुकतीच सुरुवात झाली आहे. नव्या कार्यपद्धतीशी आणि वातावरणाशी सर्वच कलाकार मंडळी जुळवून घेत आहेत. मात्र नुकतीच या मालिकेच्या सेटवरील सर्व कलाकारांना एक झकास ट्रीट मिळाली आहे. अभिनेत्री श्वेता शिंदे हिने सेटवर स्वत: सगळ्यांसाठी पुऱ्या केल्या होत्या. त्या पुऱ्या खाऊन सेटवरील मंडळी तृप्त झाली आहेत.
डॉक्टर डॉनची लाडकी डार्लिंग डीन, म्हणजेच मोनिका स्वयंपाक करतेय असा एक सीन चित्रित करण्यात येत होता. आणि याच निमित्ताने स्वयंपाकघरात शिरलेल्या श्वेताने सगळ्यांसाठी पुऱ्या तळायचं ठरवलं. सीनचं चित्रीकरण पूर्ण होताच, तिने खरोखरच पुऱ्या करायला सुरुवात केली. पुऱ्या खायला मिळणार म्हणून सगळीच मंडळी खूप खुश होती. तिच्या मुलाची भूमिका साकारणारा अभिनेता अनुराग वरळीकर सर्वाधिक खुश होता. खाण्याची आवड असल्यामुळे त्याच्यासाठी ही ट्रीट खूपच खास ठरली. श्वेताची केशभूषा करणारी, तिची असिस्टंट सुद्धा या कामात तिच्या मदतीला होती.
सेटवर मिळालेली ही ट्रीट सगळ्यांनाच आवडली.