By  
on  

संजय जाधव पहिल्यांदाच करणार वेबसिरीजचं दिग्दर्शन, 'अनुराधा' वेबसिरीजचा मुहूर्त संपन्न

प्रसिद्ध लोकप्रिय दिग्दर्शक संजय जाधव आता पहिल्यांदाच वेबसिरीजचं दिग्दर्शन करत आहेत. अनुराधा या नव्या वेबसिरीजच्या निमित्ताने त्यांनी वेब दिग्दर्शनात पदार्पण केलय.  'प्लॅनेट मराठी ओटीटी' च्या आगामी वेबसिरीजपैकी अनुराधा ही देखील एक खास सिरीज असेल. नुकताच या वेबसिरीजचा मुहूर्त मुंबईत पार पडला. 

संजय जाधव दिग्दर्शित या वेबसिरीजमध्ये अभिनेत्री तेजस्विनी पंडित, सोनाली खरे, सचित पाटील, विद्याधर जोशी, सुशांत शेलार, सुकन्या कुलकर्णी अशी स्टारकास्ट पाहायला मिळेल. 

या वेबसिरीजविषयी संजय जाधव सांगतात की, '' या वेबसिरीजबद्दल मी आता जास्त काही सांगणार नाही. एक सांगेन की, ही एक सस्पेन्स थ्रिलर असून माझ्या नेहमीच्या चौकटीबाहेर जाऊन प्रथमच काहीतरी वेगळं करण्याचा मी प्रयत्न केला आहे आणि लवकरच 'अनुराधा' 'प्लॅनेट मराठी ओटीटी'च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येईल. मला एका गोष्टीचा विशेष आनंद आहे तो म्हणजे माझी पहिली वेबसिरीज 'प्लॅनेट मराठी' सारख्या ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. ज्याने पहिला मराठी ओटीटीचा बहुमान मिळवला आहे. 'अनुराधा'मधील प्रत्येक कलाकार हा उत्कृष्ट अभिनय करणारा आहे. आणि तेजस्विनीबद्दल सांगायचं झालं तर यापूर्वीही मी तेजस्विनीसोबत अनेकदा काम केलय. ती एक हरहुन्नरी अभिनेत्री आहे. कोणत्याही भूमिकेला योग्य न्याय देण्याची ताकद तिच्यात आहे. मुळात मला तिच्या कामाची पद्धत माहित असल्याने आमच्यात एक कम्फर्ट झोन तयार झाला आहे, ज्याने आमचं काम अतिशय सुरळीत पार पडतं.'' 

प्लॅनेट मराठी ओटीटीचे सीएमडी अक्षय बर्दापूरकर या सिरीजविषयी म्हणतात की, "''संजय जाधव दिग्दर्शित अनुराधा ही वेबसिरीज 'प्लॅनेट मराठी ओटीटी'वर प्रदर्शित होणार आहे, ही आमच्यासाठीही फार मोठी गोष्ट आहे. संजय जाधव यांच्या अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. संजय नेहमीच वेगवेगळे, मनोरंजनात्मक विषय हाताळतो. त्यामुळे 'अनुराधा'ही प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल. संजयचे दिग्दर्शन, मराठी सिनेसृष्टीतील अतिशय मुरलेले कलाकार अशा सगळ्याच जमेच्या बाजू या वेबसिरीजमध्ये आहेत. 'प्लॅनेट मराठी ओटीटी', अ विस्टा मीडिया कॅपिटल कंपनी प्रेक्षकांना असाच दर्जेदार आशय देण्यासाठी नेहमीच बांधील राहील''  

तेव्हा या वेबसिरीजमध्ये काय असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive